महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चांगल्या रस्त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, १९ मे, २०१७
सांगली : गावामध्ये जाणारा रस्ता हा चांगला असला पाहिजे. जेव्हा चांगला रस्ता गावात जातो, तेव्हा गावातील अन्न-धान्य, दूध हे त्या रस्त्याने शहराकडे जात असते. शहरातील आरोग्य, शिक्षण हे गावाकडे जात असते. चांगल्या रस्त्याच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलत असतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड गायरानवाडी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या पाहणीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार डॉ.सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कार्यकारी अभियंता मिलिंद कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली असून त्यामध्ये असा नियम केला आहे की, चांगल्या दर्जाचे रस्ते हे गावापर्यंत गेले पाहिजेत. ज्यांनी हे काम केले आहे त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत याची देखभाल व दुरूस्ती करावयाची आहे, असा नियम ठेवला आहे. गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा अत्यंत मोलाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्‍त्यांचे अतिशय चांगले मजबूत प्रकारचे काम केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरवाड गायरानवाडी या रस्त्याचे चांगले काम केल्याबद्दल अभिनंदन केले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात सन 2015-2016 मध्ये सांगली जिल्ह्यात रस्त्यांची जवळपास 40 किलोमीटर लांबीची एकूण 10 कामे मंजूर असून दुसऱ्या टप्प्यामध्ये 104 कि. मी. लांबीचे रस्ते मंजूर आहेत. नवीन जोडणी करण्याची कामे शिल्लक नाहीत.

सन 2015-16 मध्ये 10 कामे मंजूर आहेत. त्यांची लांबी 39.33 कि. मी. आहे. या कामांची एकूण मंजूर रक्कम 21 कोटी, 20 लाख, 50 हजार इतकी आहे. 10 पैकी 3 कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली असून उर्वरित 7 पैकी 6 कामे मे-2017 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. उर्वरित एक काम सप्टेंबर-2017 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

सन 2016-17 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 8 कामे मंजूर आहेत. त्यांची लांबी 44.43 कि. मी. आहे. या कामांची एकूण मंजूर रक्कम 22 कोटी 74 लाख, 33 हजार रूपये आहे. सर्व 8 कामांचा कार्यारंभ आदेश होऊन कामे प्रगतीत आहेत.

सन 2016-17 मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 कामे मंजूर आहेत. त्यांची लांबी 38.985 कि. मी. आहे. या कामांची एकूण मंजूर रक्कम 20 कोटी 66 लाख 54 हजार रूपये आहे. सर्व 7 कामांचा कार्यारंभ आदेश होऊन कामे प्रगतीत आहेत. सन 2016-17 मधील तिसऱ्या टप्प्यामध्ये 6 कामे मंजूर आहेत. त्यांची लांबी 19.500 कि.मी. असून या कामांची एकूण मंजूर रक्कम 1036.20 लक्ष रूपये आहे. 6 कामांचा कार्यारंभ आदेश होऊन कामे प्रगतीत आहेत.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result