महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदार जनजागृत्ती रॅलीचे आयोजन २३ एप्रिल विसरु नका, सर्वांनी मतदान करा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण शनिवार, २० एप्रिल, २०१९


रत्नागिरी :
नगरपालिका, रत्नागिरी यांच्यामार्फत मतदारांना जागृत करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदीर, रत्नागिरी ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी पर्यंत रॅलीची आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २३ एप्रिल विसरु नका, सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आचंल गोयल, शिक्षणाधिकारी श्री. कुळाल, समाजकल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, रत्नागिरीचे मुख्याधिकारी अरविंद माळी, जिल्हा सूलभ निवडणूक संनियंत्रण समितीच्या सदस्या आस्था सोशल फाऊंडेशनच्या सुरेखा पाथरे-जोशी, अस्थिव्यंग व्यक्ती प्रतिनिधी संकेत चाळके, कर्णबधीर व्यक्ती प्रतिनिधी प्रसाद आंबोळकर आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, १७ व्या लोकशाहीच्या गठीत करण्यासाठी जवळ जवळ सर्व तयारी झाली असून २३ एप्रिल विसरु नका आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले मतदान कोणाला केले ते VVPAT वर ०७ सेंकद स्क्रीनवर दिसणार आहे ही एक नवीन सुविधा या निवडणुकीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, ज्यामुळे मतदारांनी कोणाला मतदान केले याची माहिती त्याला मिळणार आहे आणि मतदान प्रक्रियेमधील अधिक पारदर्शक होणार आहे. दिव्यांगासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ३६४ व्हीलचेअर्स उपलब्ध करुन घेण्यात आल्या असून मतदार केंद्रापर्यंत पोहण्यासाठी सर्व मतदार केंद्रावर रॅम्प उभारण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदानाची प्रक्रिया सूलभ होण्यासाठी अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आल्याचे ते म्हणाले. जिल्हा प्रशासन व निवडणूक शाखा यांच्या माध्यमातून EVM आणि VVPAT मशीनच्या वापराबाबत जनजागृती, मतदार जागृतीसाठी अनेक मतदान रॅलीचे आयोजन, आस्था सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगाची मतदान रॅली, समुद्रात मच्छीमारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन, नगरपालिका प्रशासनामार्फत ही रॅलीचे आयोजन, आदींच्या माध्यमातून तसेच स्वीपच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबतची जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या मतदार जनजागृतीचा परिणाम यावेळी मतदान टक्केवारी मधील वाढीतून नक्की दिसेल, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले लोकशाही जागराच्या प्रक्रियेमध्ये यामुळे सगळ्यांचा हातभार लागेल. आपल्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लागणे म्हणजे लोकशाहीमध्ये मी सहभाग घेतल्याचे मोठे प्रमाणपत्र आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅली समारोपाच्या वेळी सर्व उपस्थिताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शपथ दिली. या मतदान रॅलीमध्ये नगरपालिका, रत्नागिरीचे अधिकारी कर्मचारी, आस्था सोशल फाऊंडेशनचे सदस्य, मुकबधीर शाळेचे विद्यार्थी, दिव्यांग मतदार, विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदींनी सहभाग घेतला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result