महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
एक महिन्यात शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करून घ्यावे- किशोर तिवारी रविवार, ०६ ऑगस्ट, २०१७
वर्धा : जिल्ह्यातील शिल्लक दीड लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी तातडीने एक महिन्यात शिबीर आयोजित करावे. तसेच ग्रामीण भागातील 80 टक्के नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्यावा. शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास आत्महत्या कमी होतील, असे मत स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी आदी उपस्थित होते.

सध्या ग्रामीण भागातील 59 टक्के जनता तर शहरी भागातील 44 टक्के नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, मध्यम भूधारक अशा सर्वच शेतकऱ्यांचा समावेश योजनेत करावा. तसेच विधवा, परित्यक्त्या, श्रावण बाळ, अंत्योदय योजनेतील लाभार्थींचा या योजनेत प्रामुख्याने समावेश करून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनेचा लाभ द्यावा, आशा सूचना श्री. तिवारी यांनी पुरवठा अधिकारी यांना केल्या.

जिल्हा सामान्य रुग्णालयाची सेवा चांगली असून सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयांमुळे वर्धेतील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने रिक्त डॉक्टरांची पदे मुलाखती घेऊन भरावी. बँकानी शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांचे अग्रीम तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्यवस्थित माहिती द्यावी. शेतकऱ्यांना बँकेत फेऱ्या माराव्या लागू नयेत याची खबरदारी घ्यावी. सध्या पावसाच्या खंड काळात ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आंबे आणि त्यांनी वीज पंपासाठी वीज जोडणीसाठी अर्ज केला असेल त्याला तातडीने वीज जोडणी देण्याची प्रक्रिया करावी. तसेच ग्रामीण भागात लाईनमन स्वतः काम न करता दुसऱ्या मुलांना कामावर ठेवतात. असे लाईनमन आढळून आल्यास थेट अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी बचत गट, महिला बचत गट यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा समावेश होता.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result