महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कर्जमाफीच्या माध्यमातून राज्य शासनाचे बळीराजाला बळ - राज्यमंत्री चव्हाण बुधवार, १८ ऑक्टोंबर, २०१७
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र वितरण

सांगली :
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मात्र, कर्जमाफीबरोबरच शेतीमध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि यापुढील काळामध्ये त्याच्यावर कर्ज काढण्याचे संकट येऊ नये, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. कर्जमाफीच्या माध्यमातून राज्य शासनाने बळीराजाला बळ दिले आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्यासह अन्य अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्यातील 26 शेतकरी बांधवांना सपत्नीक पोषाख व कर्जमाफी प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले. त्यामुळे राज्य शासनाने केलेली कर्जमाफीची घोषणा दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर अंमलात आली. या योजनेंतर्गत सन 2009 ते 2016 या कालावधीत थकीत कर्ज असलेल्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली, त्यांनाही 25 हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येणार आहेत.

यावेळी जिल्हा उपनिबंधक म्हणाले, जिल्ह्यात कर्जमाफीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर परस्पर जमा होणार आहेत. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 3 लाख 47 हजार ऑनलाईन अर्जांची नोंदणी झाली. त्यातील 1 लाख 86 अर्ज प्राप्त झाले. यातील काही शेतकरी बांधवांना प्रातिनिधीक स्वरूपात कर्जमाफी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेली मी मुख्यमंत्री बोलतोय - महाकर्जमाफी पुस्तिकेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले.

शेतकऱ्यांना मिळाली दिवाळी भेट
यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील कर्जमाफी प्रमाणपत्रप्राप्त महिला शेतकरी मंदाकिनी चंदनशिवे म्हणाल्या, आमची 5 एकर शेती आहे. आमचे 15 ते 20 हजार कर्ज होते. हे कर्ज राज्य शासनाने माफ केले आहे. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. तर मिरज तालुक्यातील सुरेखा यशवंत पाटील म्हणाल्या, आमची एक एकर शेती आहे. 41 हजार रुपये कर्जमाफी झाली. याबद्दल राज्य शासनाचे व सर्व यंत्रणांची ऋणी आहे. मिरज तालुक्यातील टाकळीचे दयानंद कोरे म्हणाले, माझेही एक एकर क्षेत्र आहे. माझे 25 हजार कर्ज होते, राज्य शासनाकडून माफी मिळाली. शासनाने कर्ज माफ करून आम्हाला दिवाळीची भेट दिली आहे. टाकळी सर्व सेवा सोसायटीचे सचिव बाबूराव माने म्हणाले, टाकळी गावातील सोसायटीच्या 37 सभासदांची कर्जमाफी झाली आहे. तर 258 शेतकरी प्रोत्साहनपर योजनेतून पात्र झाले आहेत. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result