महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी जाणीव जागृती आवश्यक - अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे गुरुवार, २५ जानेवारी, २०१८
सायबर जनजागृती कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

सांगली :
समाजमाध्यमांमुळे देशाच्या सीमारेषा पुसून गेल्या असून, लोक जवळ आले आहेत. मात्र, वाढत्या इंटरनेट वापरामुळे सायबर गुन्हेगारीच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि गोपनीयता याला मोठा धोका निर्माण झाला आहे. इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्याने सायबर गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळांचे आयोजन त्यासाठी मदतीचे ठरेल, असे प्रतिपादन सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी आज येथे केले.

ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर जनजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर, आयसीआयसीआय बँकेच्या रिजनल ग्रुपचे विनायक राजाध्यक्ष, फायनान्शियल क्राईमचे रिजनल मॅनेजर सुमीत महाबळेश्वर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदी उपस्थित होते. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला.

अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे म्हणाले, समाजमाध्यमांच्या गैरवापरामुळे सायबर गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय. अशा वेळी आपल्या गोपनीय माहितीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना आपल्या जबाबदारीचे भान राखावे. फोनद्वारे कोणतीही बँक संदर्भातील माहिती अथवा आपली व्यैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. ऑनलाईन व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्यावी. कोणासही आपला ओटीपी क्रमांक देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्राचार्य बी. व्ही. ताम्हणकर, आयसीआयसीआय बँकेच्या रिजनल ग्रुपचे विनायक राजाध्यक्षयांनीही माहिती दिली.

फायनान्शियल क्राईमचे रिजनल मॅनेजर सुमित महाबळेश्वर यांनी डिजिटल, ऑनलाईन, मोबाईल बँकिंग, त्यातील तांत्रिक बाबी, त्याची सुरक्षितता, ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, होणाऱ्या फसवणुकीचे विविध प्रकार, डेटा चोरीची माध्यमे व त्यापासून घ्यावयाची खबरदारी, एटीएम मधून पैसे काढताना घ्यावयाची सतर्कता, ई-मेल द्वारे येणारे परदेशी लॉटरी जिंकल्याचे आमिष व त्या माध्यमातून होणारी फसवणूक, करावयाच्या आणि न करावयाच्या बाबी यांची माहिती दिली.

प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. सूत्रसंचालन व आभार वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री माळी यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result