महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बँकाच्या आर्थिक शिस्तीमुळे जिल्ह्यासह देशाच्या विकासालाही चालना मिळते- पंकजा मुंडे बुधवार, २८ जून, २०१७
बीड : बँकेतील ठेवी वाढल्या म्हणजे सुबत्ता वाढली असे समजले जाते. परंतु बँकेतील पैसा हा तसाच पडून न राहता खेळता राहिला तर बँकेच्या प्रगतीस चालना मिळते. त्यासाठी घेतलेले कर्ज नियमित फेडणे आणि ठेवी ठेवणे यासारखी आर्थिक शिस्त बाळगल्यास जिल्ह्यासह देशाच्याही विकासाला निश्चित चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

बीड येथील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक लि. मुंबई (दि विदर्भ को -ऑपरेटीव्ह बॅंक लि. सम्मिलित) बीड येथील शाखेच्या उदघाटनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड आदींची उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, बँका या कामधेनूप्रमाणे असतात. त्यांचे पालनपोषण व्यवस्थित केल्यास या बँका आपणास अनेकविध सेवा पुरविण्यास सक्षम होतात. ज्याप्रमाणे बँकांमधून कर्ज घेतले जाते त्या प्रमाणात बँकांमध्ये ठेवीही जमा झाल्या पाहिजेत. तरच आर्थिक शिस्त कायम राहून बँकाची प्रगती होण्यास मदत होते. पर्यायाने ग्राहक, शेतकरी यांनाही त्याचा फायदा होतो.

गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज त्यांनी नियमितपणे भरल्यास त्यांच्यावर भार पडणार नाही. तसेच नियमित कर्जफेड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य सरकारने घेतलेला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाचे मी स्वागत करते आणि या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन करते. बँकांच्या माध्यमातून विविध योजनाअंतर्गत कर्ज वाटप करण्यात येते. यामध्ये शेतकरी आणि बचतगटाच्या महिलांना प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, आमदार विनायक मेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी बँकेच्या वाटचालीविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज मंजूरी पत्राचे वाटप तसेच मुदतठेव पावतीचे वाटप करण्यात आले. आभार ए.एस. नगरनाईक यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result