महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नामांकित छायाचित्रकारांचे ‘महाराष्ट्र माझा’ प्रदर्शन टाऊन हॉल येथे सुरु शुक्रवार, ०६ जानेवारी, २०१७
ठाणे : प्राचीन भारतीय कला-संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव आदी वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेले प्रदर्शन आजपासून ठाणेकरांना पहावयास मिळणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्र माझा’ ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे ठाण्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील टाऊन हॉलमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले. रविवार ८ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.

कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार मोहन बने त्याचप्रमाणे ठाण्यातील छायाचित्रकार, पत्रकार तसेच कलाप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी सर्वांचे स्वागत केले.

प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. राज्यातील कानाकोपऱ्यातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकजीवन, प्राचीन वारसा, कानाकोपऱ्यातील विविध संस्कृती, वन्यजीव, गडकिल्ले, वृक्षसंवर्धन आदी विषयांवरील नामवंत छायाचित्रकारांनी कल्पकतेने काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत.

सदर प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ८ जानेवारीपर्यंत टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम येथे नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, छायाचित्रकार, पत्रकार व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी केले आहे. आजच्या उद्घाटन कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन, संजय पितळे, दीपक दळवी, दिलीप शिंदे, चंद्रकांत भोईटे आदींची उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result