महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे टंचाईच्या कामाला गतिमानता प्राप्त - पालक सचिव सीताराम कुंटे शुक्रवार, १७ मे, २०१९

नाशिक : दुष्काळजन्य परिस्थितीत आवश्यक त्या ठिकाणी टँकरचा योग्य पुरवठा होण्यासाठी  टँकर्सवर लावण्यात आलेली जीपीएस प्रणाली, त्याचप्रमाणे चारा छावण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या पशुधनाला पुरविण्यात आलेला बारकोड या तंत्रज्ञानामुळे टंचाईच्या काळात कामाला गती आली आहे. त्यामुळे पुरविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर देखील बारकाईने लक्ष ठेवणे सोपे झाले आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, सहायक जिल्हाधिकारी पंकज आथिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. लांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या समवेत संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

श्री.कुंटे म्हणाले, टंचाई निवारणाचे कामकाज सर्व संबंधित यंत्रणांनी सजग राहून पूर्ण करावे. त्याचप्रमाणे आवश्यक त्या सर्व ठिकाणी दौरे करून वस्तुस्थिती जाणून घेऊन तेथील लोकांना सर्वतोपरी मदत पुरविण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना यावेळी दिल्या. टंचाईग्रस्त भागात शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन काम करावे, ज्यामुळे आवश्यक ठिकाणी त्वरीत मदत मिळून तेथील लोकांच्या समस्या त्वरीत सोडविणे शक्य होईल तसेच यावेळी फळबागा वाचविण्यासाठी करण्यात आलेला मलचिंगचा उपयोग अतिशय फायदेशीर असल्याचेही श्री.कुंटे यांनी सांगितले त्याचप्रमाणे टंचाई संदर्भातील करण्यात येणाऱ्या कामांच्या बाबतीत त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात जुलै, 2019 पर्यंत पुरेल इतका दहा हजार एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील 12 लाख पशुधनासाठी दरमहा दोन लाख मे.टन चारा आवश्यक असून जिल्ह्यात चार लाख मे.टन चारा उपलब्ध आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत 55 लाख मजुरांना काम उपलब्ध होईल असे 16 हजार कामांचे शेल्फ तयार करण्यात आली असून त्यांची यादी ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात आली आहे. टंचाई अंतर्गत टँकर्स पुरवठा, चारा छावण्या, रोजगार हमी योजनेअंतर्गत निर्माण होणारी कामे, पाणी पुरवठा योजना, वीज पुरवठा याबाबत सविस्तर वस्तुस्थितीदर्शक अहवाल जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी सादर केला.

बैठकीसाठी सर्व तालुक्यांचे प्रांत अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result