महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सहकाराच्या गुणात्मक वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी विश्वस्ताची भूमिका बजावावी- सुभाष देशमुख शनिवार, २२ जुलै, २०१७
सांगली : सहकार क्षेत्राच्या दर्जेदार व गुणात्मक विकासासाठी सहकरी चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करावे. तसेच आपल्या ठेवीदार सभासदांच्या ठेवींना संरक्षण देण्याचे कामही प्राधान्याने करावे, असे प्रतिपादन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

डेक्कन मॅन्युफॅक्चर्स हॉल येथे वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील पतसंस्थांच्या सहकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्यासह फेडरेशनचे व पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, सहकारी संस्था अधिक पारदर्शी आणि लोकाभिमुख करून सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यास प्राधान्य दिले असून सहकार क्षेत्रातील कर्ज वसूलीबाबत येणाऱ्या अडीअडचणी तसेच लावण्यात येणाऱ्या सरचार्जबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. पतसंस्थांच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील.

यावेळी श्री. चरेगांवकर, श्री. गाडगीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक शशिकांत राजोबा यांनी स्वागत केले. संस्थेचे चेअरमन प्रकाश सांगावे यांनी प्रास्ताविक केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result