महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पर्यटनस्थळ तसेच मत्स्य उत्पादन केंद्र म्हणून कॅुंवारा भिवसेन विकसित करणार - मुख्य सचिव मल्लिक शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७
नागपूर : कुँवारा भिवसेनला लाभलेली भौगोलिक, नैसर्गिक वनसंपदा, गौंड आदिवासी संस्कृती आणि हजारो वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करता रामटेकप्रमाणे या भागाचाही पर्यटनस्थळासोबतच मत्स्य उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज सांगितले.

येथील गौंड आदिवासींचे तीर्थस्थळ व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कुँवारा भिवसेन प्रकल्पाला श्री. मल्लिक यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, प्रशिक्षणार्थी श्रीमती इंदू जाखड, नियोजनचे उपायुक्त बी. एस. घाटे, मत्स्य विकास महामंडळाचे दीपक चव्हाण, इंडोप्रेस्का ओव्हरसिज कंपनीचे सुनील कुमार तोमर, माजी आमदार आशिष जैस्वाल, कुँवारा भिवसेन संस्थानचे अध्यक्ष शांताराम मडावी, पोलीस पाटील रवी बगमारे आणि सरपंच भगवान गद्रे यांची उपस्थिती होती.

नवेगाव खैरी येथील तलावातील माशांच्या लिलावात स्थानिक मासेमार बांधवांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर शासनाचा भर आहे. त्यासंबंधी लवकरच बैठक आयोजित करुन मासेमारांच्या समस्यांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी दिले. तसेच पर्यटनस्थळासाठी आवश्यक ती वन्यप्राणी, पशू-पक्षी, नैसर्गिक वनसंपदा आदी पार्श्वभूमी लाभलेली असून, तलावात सी-प्लेन, नौकाविहार, हाऊसबोट, चिल्ड्रन पार्क, हत्तीच्या सफारी यासारख्या मूलभूत सुविधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देत स्थानिकांना येथेच रोजगार मिळवून देऊ. तसेच पर्यटनस्थळाच्या विकासासाठी त्याचा विकास आराखडा लवकरच मंजूर करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

श्री. मल्लिक म्हणाले, जलसाठ्याचा वापर मत्स्य पालनासाठी केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विभागात तलाव तेथे मासोळी हे अभियान राबविताना या अभियानाला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत असून, मत्स्यपालनामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पूरक उद्योग तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नीलक्रांतीची सुरुवात नागपूर विभागापासून सुरु करण्यात आली आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या मत्स्यबिजाची निर्मिती करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने पुढाकार घेत येथे रेड तेलापीया, ब्लॅक तेलापीया, कटला, रोहू, मरगळ, कॉमन क्रॉप सीड्स पंगॅसीएस आदी प्रकारचे मत्स्यबीज केंद्रही सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी कुँवारा भिवसेनचे दर्शन घेतले. त्यावेळी संस्थानचे अध्यक्ष शांताराम मडावी यांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने शाल, श्रीफळ आणि भिमाना इतिहास पुस्तक भेट दिले. तत्पूर्वी त्यांनी नवेगाव खैरी येथील महाराष्ट्र मत्स्य विकास विभागातर्फे मुंबई येथील इंडोप्रेस्का ओव्हरसिज कंपनीच्या हॅचरी व अत्याधुनिक मत्स्य प्रजनन तंत्रज्ञान असलेल्या विविध उपक्रमांना भेट दिली. तसेच नीलक्रांती मोहिमेअंतर्गत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळातर्फे पी.पी.पी. मोडमध्ये उभारण्यात आलेल्या पिंजरा पद्धतीचे बंदिस्त मत्स्यपालन प्रकल्पाला बोटीद्वारे भेट देऊन पाहणी केली.

कुँवारा भिवसेन येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी असून, स्थानिकाच्या सहभागातूनच येथील विकास घडवून आणायचा आहे. येथे राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार मत्स्यसंवर्धनासोबतच मत्स्यपालन आणि पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार आहोत. त्यासाठी मासेमार बांधवांचे हक्क अबाधित ठेवण्याला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.

सुसंवादातून मार्ग काढून कोणाचीही उपासमार होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाईल. मासेमारी करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या हिताचा निर्णय घेत, त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यावर भर देणार असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मासेमारांशी संबंधित समस्यांबाबत माहिती दिली. मत्स्यबीज महामंडळाचे दीपक चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी आदर्श मत्स्य व्यवसायी सहकारी संस्था पारशिवनी, नियोजित जय सेवा आदिवासी मत्स्य सहकारी संस्था कोलितमारा, नियोजित भिमालेपन मत्स्य सहकारी संस्था बाबुलखेडा, पेंच प्रकल्प, किरंगी सर्रा आदिवासी मत्स्य सहकारी संस्था किरंगी सर्रा तसेच इतर विविध मत्स्य सहकारी संस्थांचे सदस्य यावेळी उपस्थ‍ित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result