महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी- पंकजा मुंडे शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०१७
बीड : अंबाजोगाई शहर हे शिक्षणाचे व संस्कृतीचे माहेरघर असून येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलामुळे येथील खेळाडूंना खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. भविष्यात येथे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच येथील खेळाडूंना आपल्या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

अंबाजोगाई येथील तालुका क्रीडा संकुलाच्या भूमीपूजनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश मोरे, सुनिल गिराम, रमेश पोकळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नंदा खुरपुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, क्रीडा संकुलामुळे अंबाजोगाई तालुक्यासह परिसरातील खेळाडूंना विविध खेळाच्या चांगल्या सुविधा मिळणार असल्याने खेळाची आवड असणाऱ्या या भागातील खेळाडूंना चांगली संधी मिळणार आहे. तसेच येणाऱ्या काळात भागात उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यासाठी संबंधिताने प्रयत्न करावे. खेळाडूनेही आपल्या खेळाच्या माध्यमातून तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव देश पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे. या क्रीडा संकुलामध्ये उत्तम प्रकारचे व दर्जेदार सुविधा मिळतील, अशा प्रकारचे काम करुन एक आदर्श क्रीडा संकुल निर्माण करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे. तसेच क्रीडा संकुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभारण्यास शासनाने मान्यता दिली असून 4.29 हेक्टर शासकीय जमीन तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. अंबाजोगाई तालुका क्रीडा संकुलामध्ये 400 मीटर धावणे मार्ग, मोठा जिम्नॅशियम, इन्डोअर हॉल, जलतरण तलाव, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल अशा विविध खेळांची मैदाने आदी उभारण्यात येणार आहेत. शासनाने तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीकरिता एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून बॅडमिंटन हॉल, कार्यालयीन इमारत व जीम हॉल बांधणे, 400 मीटर धावणे आणि विविध खेळांच्या मैदानाच्या जागेचे सपाटीकरण इत्यादी कामे सुरु करण्यात येत आहेत.

अंबाजोगाई येथील क्रीडा संकुल भूमीपूजन समारंभास नगरसेविका श्रीमती संगीता व्यवहारे, बबिता आदमाने, डॉ. शालिनी कराड, श्री.गणेशकर, विभिषण गित्ते, क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, गटविकास अधिकारी दत्तात्रय गिरी आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result