महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पोलीस पाटलांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करणार - पालकमंत्री अनिल देशमुख शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०


गोंदिया :
पोलीस पाटील हा शासनाचा एक घटकच आहे. गावात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे. पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्यात येईल. असे प्रतिपादन गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

२४ जानेवारी रोजी सौंदड रेल्वेस्टेशन येथील गोवारी स्मारकाच्या पटांगणावर पोलीस पाटील दिनानिमीत्त एक दिवशीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले होते. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य मंजुषा डोंगरवार, सडक/अर्जुनी नगराध्यक्ष देवचंद तरोणे, गडचिरोलीचे माजी आमदार हरिराम वरखेडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, ग्रामपंचायत फुटाळा सरपंच सुनिता गोबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.देशमुख पुढे म्हणाले, पोलीस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे चांगले काम करीत आहेत. ते पोलीस विभागाशी समन्वय साधून गावात सामाजिक सलोखा राखण्यात मोलाची मदत करीत असतात. विविध निवडणूकीत ते पोलिसांना सहकार्य करीत असतात. ३० टक्के महिलांचा सहभाग पोलीस पाटील म्हणून काम करतात. पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस पाटलांचे सहकार्य असते. पोलीस पाटलांना ६५०० रुपये मानधन मिळण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन ते मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पोलीस पाटलांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर नक्कीच प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

श्री.पटोले म्हणाले, राज्यात विविध संघटनांचे प्रश्न आहेत. पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे मिटींग लावून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आपला भाग नक्षलग्रस्त आहे. पोलीस पाटील हे महत्वाचे पद आहे. त्यांच्या समस्यांची नक्कीच दखल घेण्यात येईल. गावातील सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस पाटील हा गावचा प्रमुख आहे. पाटलांनी पाटलासारखे राहिले तर सन्मान राहतो. आपल्या वागणूकीने सन्मान मिळतो असे त्यांनी सांगितले.

श्री.चंद्रिकापुरे म्हणाले, वडील पोलीस पाटील होते. पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या आपल्याला माहित आहे. पोलीस पाटील आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडतात. पोलीस पाटलांच्या मागण्यांचा नक्कीच विचार झाला पाहिजे. आमदार म्हणून आपण पोलीस पाटलांच्या पाठीशी आहोत. पोलीस पाटलांनी संघटनेच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करुन घ्याव्यात. पोलीस पाटलांच्या मागण्यांचा विधानसभेत आपण विचार करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, पोलीस पाटील हे गावातील सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यांचे मानधन १५ हजार रुपयापर्यंत झाले पाहिजे. सेवानिवृत्तीचे वय ६० वरुन ६५ वर्ष झाले पाहिजे. त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर घेण्यात यावे अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result