महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री सुभाष देशमुख शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८
प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगली :
सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सांगली जिल्हा कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भुकटे दादा, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर आदि मान्यवर उपस्थित होते.

परेड संचलनानंतर उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातून एकूण 1 लाख 86 हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी जवळपास 78 हजार शेतकऱ्यांना जवळपास 187 कोटी 37 लाख इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून बळीराजाला आधार देण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे, असे ते म्हणाले.

संपूर्ण देशात महसूल विभागांतर्गत आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हाधिकारी कार्यालय, 5 उपविभागीय कार्यालये व 10 तहसिल कार्यालये या सर्वांनाच एकाच वेळी ISO 9001:2015 मानांकन मिळालेला सांगली जिल्हा एकमेव जिल्हा आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी वि. ना. काळम व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात सांगली जिल्ह्यात चांगली कामे झाली आहेत. मात्र, हे अभियान जिल्ह्यात आणखी प्रभावीपणे राबवून जिल्हा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, बाजारातील भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना मदतीची ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यास हमीभावाच्या आत व बाजारभावाच्या 70 टक्क्यांपर्यंत रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यात येते. बाजारातील भाव वाढल्यानंतर वाढीव भावाचा फायदाही शेतकऱ्याला घेता येतो. राज्यात व सांगली जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबधित बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्याचा बाजार समितीमधील प्रत्यक्ष व प्रभावी सहभाग असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी निवडून दिलेले संचालक मंडळ असणे अपेक्षित आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने कायद्यात आवश्यक ती दुरूस्ती केली आहे. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज जास्तीत जास्त शेतकरीभिमुख व त्याच्या आर्थिक हिताचे होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, घटनादुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमिवर राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने आजपासून 10 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही, निवडणूक व सुशासन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. याला सुजाण नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी परेड निरीक्षण केले. यावेळी आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला. तसेच, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रवींद्र शेख यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज निधीमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, जिल्हा उद्योग पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार, विविध अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आजच्या संचलनामध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, वनरक्षक दल, नॅशनल कॅडेट कोअर पथक, वाहतूक शाखा पथक, पोलीस बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, बाँब शोधक-नाशक पथक, जेलकैदी पथक वाहन, विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच पथक अशा जवळपास 30 पथकांनी सहभाग घेतला. यामधील विविध चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक विभाग, वैद्यकीय सेवा, सामाजिक वनीकरण राष्ट्रीय हरित सेना या विभागाच्या चित्ररथांचा समावेश होता.

समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, दलित मित्र, शिक्षक, नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result