महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हिंगणी येथे केले श्रमदान शुक्रवार, १० मे, २०१९


बीड :
राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे दोन दिवसीय दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी विविध गावांतील चारा छावण्यांना भेटी देत असून या दरम्यान गावांमध्ये सुरु असलेल्या जलसंधारण कामांची देखील पाहणी करत आहेत. आज सायंकाळी त्यांनी बीड तालुक्यातील हिंगणी येथे शेतकरी व महिलांसोबत श्रमदान केले.

पाणी टंचाईवर टँकरही तात्पुरती उपाययोजना असून दुष्काळावर मात करण्यासाठी पुढील काळात कायमस्वरुपी उपाय करण्यात येतील असे उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

यापुर्वी आज दुपारी त्यांनी तळेगाव येथे भर उन्हात श्रमदान केले होते. ही दोन्ही गांवे पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत उतरली आहेत. सध्या या दोन्ही ठिकाणी ग्रामस्थ एकजुटीने दुष्काळ निवारणासाठी एकत्र आले आहेत. पंकजा मुंडे यांनी याठिकाणी फावडे व टोपले घेवून श्रमदान केले. संध्याकाळी साडे सात वाजता सुमारास हिंगणी बु येथे त्या पोहोचल्या, याठिकाणी जनतेचा उत्साह पाहून त्या अक्षरशः भारावून गेल्या. यावेळी ग्रामस्थांसमोर बोलताना त्यांनी जिल्हयाला दुष्काळातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. पानी फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. आ.संगीता ठोंबरे, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result