महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा कृषि महोत्सवासाठी अतीसूक्ष्म नियोजन करावे - कृषि राज्यमंत्री सदाशिव खोत बुधवार, २४ जानेवारी, २०१८
सांगली : प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी व अन्य शेतकऱ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. त्यासाठी देशभरात आणि जगभरात कृषि क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमिवर जिल्हा कृषि महोत्सवाचे दर्जेदार आयोजन करावे. त्यासाठी अतिसूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे कृषि महोत्सव आयोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि.ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ, आत्माचे चंद्रकांत जगताप आदि उपस्थित होते.

इस्लामपूर येथे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणारा हा जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करावी. तसेच, या समित्यांमध्ये विविध संबंधित खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, असे सूचित करून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कृषि महोत्सवासाठी प्रमाणित कृती आराखडा तयार करावा. 1 फेब्रुवारीपासून इस्लामपूरमधून कामकाज पाहावे, जेणेकरून कार्यवाहीला गती येईल. कृषि महोत्सवामध्ये उभारण्यात येणारे स्टॉल्समधून शेतकऱ्याला अद्ययावत तांत्रिक उत्पादनांची माहिती व्हावी, यासाठी प्रयत्न करावा. महोस्तवाची 26 जानेवारीच्या ग्रामसभेतून गावा-गावांत माहिती द्यावी. तसेच, यामध्ये कृषि प्रक्रिया व अन्न प्रक्रिया उद्योग, जोडधंदे, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषि मालाची आयात-निर्यात अशा अनेक बाबींतील अद्ययावत माहिती होण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करावे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना, तरूणांना नवनवे उद्योग सुरू करण्याची प्रोत्साहन, प्रेरणा मिळावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस कृषि महोत्सवासाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या प्रमुखांसह कृषि, महसूल, आरोग्य, समाजकल्याण, पोलीस विभागासह अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result