महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिर्डी लोकसभा निवडणूक, पथके रवाना रविवार, २८ एप्रिल, २०१९


१७१० मतदान केंद्रांवर १५ लाखाहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

१० हजारावर अधिक अधिकारी-कर्मचारी नियुक्त

शिर्डी :-
३८ -शिर्डी(अ.जा.) लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या, सोमवार दिनांक २९ एप्रिल २०१९  रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ ही मतदानाची वेळ असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील १७१० मतदान केंद्रावर १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. यात ८ लाख २१ हजार ४०१ पुरुष व ७ लाख ६२ हजार ८३२ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) आज रविवारी मतदान साहित्यासह रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदारांनी मुक्त व निर्भयपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी.एल. सोरमारे यांनी केले आहे.

या निवडणुकीत १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १७१० मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी ३४२० बॅलेट युनिट, १७१० कंट्रोल युनिट व १७१० व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहेत. वाटप करण्यात आलेले साहित्य आणि मतदान यंत्रे घेऊन पुरेशा बंदोबस्तात संबंधित पथकांना मतदानकेंद्रांवर रवाना करण्यात आले.सखी मतदान केंद्राची निर्मिती
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा विधानसभा क्षेत्रात ९ मतदान केंद्रांवर महिलाराज राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबध्दतेचा भाग म्हणून या लोकसभा निवडणूकीसाठी महिलांनी चालविलेले मतदान केंद्र असणार आहे. महिलांचा सहभाग असलेल्या या केंद्राला सखी मतदान केंद्र असे म्हटले जाणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी अकोले विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. १२८ अकोले अगस्ती विद्यालय अकोले, मतदान केंद्र क्र. १२९ अकोले अगस्ती विद्यालय अकोले, संगमनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र. १५५ पी. जे. आंबरे पाटील कन्‍या विद्यालय संगमनेर, शिर्डी मतदार संघातील मतदान केंद्र क्र. ९० शारदा विद्या मंदिर राहाता, मतदान केंद्र क्र. ६० जिल्‍हा परिषद शाळा पिंपळवाडी, कोपरगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. १०० नवीन म. अ. कार्यालय कोपरगाव, मतदान केंद्र क्र. १२८ डॉ. सी.एम. मेहता कन्‍या विद्या मंदिर कोपरगाव, श्रीरामपूर मतदार संघातील मतदान केंद्र क्र. ११५ डी.डी. काचोळे माध्‍यमिक विद्यालय श्रीरामपूर , नेवासा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. ४९ सुंदरबाई गांधी कन्‍या विद्यालय नेवासा खुर्द आदी केंद्राचा समावेश आहे.

१७४ मतदान केंद्रावरुन होणार मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंग
शिर्डी लोकसभा निवडणुकीत लाइव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्‍हावी , कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहण्‍याच्‍या दृष्‍टीने निवडणूक आयोगाकडून नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात येत आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात १७४ मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्‍यात येणार आहे. मतदान केंद्राचा परिसर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली येणार आहे. त्यानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मतदान केंद्र परिसरातील सर्व हालचाली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पाहता येणार आहेत.

भारत निवडणुक आयोगाचे मुख्य निवडणुक निरीक्षक विरेंद्रसिंग बंकावत,जिल्हा निवडणुक अधिकारी राहुल व्दिवेदी, अपर जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्‍यासाठी सर्व उपाययोजना करण्‍यात येत आहेत. १७४ मतदान केंद्रावर लाइव्ह वेबकास्टिंग करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये अकोले ३१, संगमनेर 28, शिर्डी 30, कोपरगाव २७, श्रीरामपूर ३१, नेवासा २७ या मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्‍यात येणार आहे.

मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह ११ फोटो ओळखपत्र आवश्यक
मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदान ओळखपत्र (ईपीक कार्ड) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी इतर ११ पर्यायी दस्तावेज ग्राहय धरण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे, नागरिकांनी मतदान ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम ह्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र, बॅंक, पोस्ट ऑफीसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय)द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तावेज, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदानावेळी सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी औद्योगिक आस्थापनांना सुटी
मतदानाच्या दिवशी लोकसभा मतदारसंघातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापारी आस्थापना, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे आदेशित केले आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली असून या आस्थापनांतील सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलींग बुथसाठी मतदान केंद्रापासून २०० मीटरची अट
मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून २०० मीटर दूर पोलींग बूथ लावावा लागणार आहे. याशिवाय, याठिकाणी त्यांना केवळ एक टेबल आणि दोन खूर्ची ठेवता येणार असून सावलीसाठी छत्रीचा आधार घ्यावा लागेल. त्याठिकाणी कनात किंवा तंबू उभारण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणार आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी.एल.सोरमारे यांनी केले आहे. याशिवाय, मतदान केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट वापरण्यास प्रतिबंध असणार आहे. केवळ अधिकृतरित्या निवडणूक कामांसाठी नियुक्त अधिकारी आणि पोलीस यांच्यासाठी यांनाच त्यातून सवलत असणार आहे.

दिव्‍यांग आणि वृद्धमतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था
दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर पोहचण्‍यासाठी वाहतुक व्‍यवस्‍था, मतदनीस, विशेष मतदनीस, ब्रेल लिपीची आवश्‍यकता असलेल्‍या मतदारांना आवश्‍यक सुविधा पुरविण्‍यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता 6 विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तिंसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर सुलभ प्रक्रियेचा लाभ घेऊन दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मतदान केंद्रावर सुविधा
निवडणूक आयोगाने यावर्षीच्या निवडणूका महिला व दिव्यांग सुलभ जाहीर केल्या असून दिव्यांगाना मतदान केंद्रात विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गरोदर महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी सहकार्य व प्राधान्य देण्यात येणार आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result