महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवण्यास शासन कटिबद्ध - पालकमंत्री पंकजा मुंडे शनिवार, ११ मे, २०१९


पाणीटंचाईची पाहणी करण्याकरता पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या गाव व तांड्यांना भेटी

बीड :
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मे महिना महत्त्वाचा असून प्रत्येक व्यक्तीस पाणी पुरविता यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पाणीटंचाई मध्ये नागरिकांना व जनावरांना पाणी पुरविण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचा विश्‍वास राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिला.

जिल्ह्याला भेडसावत असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज ग्रामीण भागातील गाव -तांड्यांना भेटी देऊन ग्रामस्थ व जनतेच्या अडचणी समजावून घेतल्या.

पाण्याची कमतरता असलेल्या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून यासाठी विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तसेच जवळचे जलस्रोत व पाणीसाठे यापासून टॅंकरद्वारे परिसरातील गावांना पाणी दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पंकजा मुंडे या दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी जिल्ह्यात असून काल त्यांनी पाटोदा, बीड, शिरूर, आंबेजोगाई या गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी चारा छावण्यांची देखील पहाणी केली होती.

आजच्या दौऱ्यात श्रीमती मुंडे यांनी परळी तालुक्यातील रेवली तांडा, वाका, गोवर्धन ग्रामपंचायत आणि सिरसाळा येथे भेट देऊन पाणी टंचाई संदर्भातील उपाययोजनांची पहाणी केली.यावेळी त्यांनी गोवर्धन ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरविण्यासाठी बनविण्यात आलेल्या टाकीची व नळाद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या पाणी योजने बद्दल समाधान व्यक्त केले .

सिरसाळा येथे ग्रामस्थांच्या अडचणी समजावून घेत टँकरची संख्या वाढविण्यासाठी तातडीने प्रशासनाला निर्देश दिले तसेच याबाबत तहसीलदार परळी यांनी लक्ष घालून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद, पाणीपुरवठा विभाग, महसूल आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result