महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वित्तीय सेवा देणाऱ्या यूबीएस कंपनीच्या विस्तारीकरणातही राज्य शासनाचे सहकार्य – मुख्यमंत्री बुधवार, १९ एप्रिल, २०१७
 यूबीएस बिझिनेस सोल्युशन सेंटरचे नवी मुंबईत उदघाटन

ठाणे :
जगभरातील उद्योग, संस्था यांना वित्तीय सल्ला देणाऱ्या तसेच संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापनात अग्रणी अशा यूबीएस कंपनीच्या बिझिनेस सोल्युशन सेंटरचे कार्यालय आता पुण्यापाठोपाठ मुंबईत सुरू होत आहे ही आनंदाची बाब असून या नामांकित कंपनीने मुंबई आणि महाराष्ट्रात अधिक विस्तार करण्याचे ठरविल्यास आपण स्वागतच करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते आज ऐरोली नॉलेज पार्क येथे यूबीएस बिझिनेस सोल्युशन सेन्टरचे उद्घाटन करताना बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, इथे हे सेंटर सुरु होणे म्हणजे पुण्यासारख्या आयटी हब पासून मुंबईसारख्या देशाच्या फायनान्शियल हबकडे केलेला हा प्रवास आहे, असे मी समजतो. याठिकाणी देशाच्या वित्तीय राजधानीत संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूक व्यवस्थापनास मोठा वाव असून तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यूबीएसने सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून राज्यातील काही शाळांमधून डिजिटल शाळेचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे त्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले तसेच कंपनीच्या संपूर्ण जागतिक विस्तारीकरणात महाराष्ट्राचे तुम्हाला सहकार्य राहील, असेही सांगितले.

प्रारंभी कंपनीचे ग्रुप व्यवस्थापकीय संचालक एक्सेल लेहमन यांनी आपल्या प्रास्ताविकात मुंबईसारख्या वित्तीय घडामोडीच्या शहरांत कंपनीचे केंद्र सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. सध्या ३०० कर्मचारी याठिकाणी काम करणार आहेत, असेही ते म्हणाले. संपूर्ण भारतात ११ हजार कर्मचारी काम करीत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई आणि महाराष्ट्रातील तंत्रकुशल मनुष्यबळ, शैक्षणिक सोयी सुविधा, प्रचंड संधी आणि उद्योगस्नेही वातावरण यांचा विचार करून कंपनीने मुंबईत हे केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.

यूबीएस ही गेल्या १५० वर्षांपासून जगभरातील विविध उद्योग, संस्था यांना वित्तीय सेवा पुरवीत आहे. झुरीच, स्वित्झर्लंड येथे या कंपनीचे मुख्यालय असून जगभरातील सर्व प्रमुख वित्तीय केंद्रांच्या ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत. यूबीएसची बिझिनेस सोल्युशन सेंटर्स ही बँकेच्या नेटवर्कमध्ये आपली सेवा देत असतात.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सेंटरची पाहणी करून विविध कामांची माहिती करून घेतली तसेच अचानकपणे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. या त्यांच्या कृतीमुळे कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result