महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चारा छावणीच्या प्रलंबित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घ्या - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर बुधवार, ०८ मे, २०१९
सातारा : माण तालुक्यात शासनाने मंजूर केलेल्या चारा छावण्या सुरु आहेत. माण तालुक्यातील मोगराळे व वडगाव या चारा छावण्यांस आज भेट दिली. चारा छावणीतील जनावरांना शासनाच्या निकषानुसार चारा, पेंड व पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. चारा छावणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असल्यास त्यावर तात्काळ निर्णय घ्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.

दहिवडी येथील तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपायुक्त प्रतापराव जाधव, उपायुक्त नीलिमा धायगुडे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रोहयोंतर्गत सार्वजनिक कामांचे प्रस्ताव आले तर त्यास तात्काळ मंजुरी द्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, टँकरच्या खेपा शंभर टक्के होण्यावर भर द्या, टँकरचे मॉनिटरींग जीपीएसच्या माध्यमातून मोबाईलद्वारे करावे. हे काम संबंधित तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी करावे. टँकरच्या खेपा लॉगबुकशीटशी पडताळून पहावे. धरणातून सोडण्यात येणारा पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच उपलब्ध करुन देण्यात यावा, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच चारा छावण्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे पालन चारा छावण्या तंतोतंत करतील यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या.

विभागीय आयुक्तांनी टंचाईच्या उपायासंदर्भात विविध सूचना केल्या आहेत, या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, टंचाई भागातील पाणी उपसा शंभर टक्के बंद झाला पाहिजे. यासाठी महसूल विभाग, इरिगेशन विभाग यांनी समन्वयाने काम करावे. ज्या ठिकाणी अवैध पाणी उपसा होत असेल त्या ठिकाणचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तात्काळ काढून टाकावे. प्रलंबित चारा छावणीचे प्रस्ताव दोन दिवसांत पाठवा. टंचाई उपाय योजनेसाठी अधिकाऱ्यांनी आता फिल्डवर येऊन काम केले पाहिजे. टंचाई कामात लक्ष केंद्रीत करुन कामे गतीने करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.

ग्रामपंचायतींमार्फत नरेगाची कामे व टँकरच्या खेपांची टक्केवारी वाढविण्यावर योग्यरित्या काम केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त यांनी माण तालुक्यातील ढाकणी तलावाची पाहणी केली.

विभागीय आयुक्तांची मोगराळे व वडगांव येथील चारा छावणीस भेट

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज माण तालुक्यातील मोगराळे व वडगांव येथील चारा छावणीस भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्तांनी जनावरांना चारा, पाणी, पेंड व्यवस्थित मिळते का याबाबत पशुपालक समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी हालचाल रजिस्टर, छावणी भेट रजिस्टर, चारा वाटप रजिस्टर, चारा स्टॉक रजिस्टर, पेंड स्टॉक रजिस्टर, पशुपालक समिती रजिस्टर तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. चारा छावणीतील जनावरांचे टँगींग करण्यात यावे, तसेच या जनावरांचे १०० टक्के लसीकरण करावे,अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बिजवडी तालुका माण येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result