महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची टंचाईग्रस्त गावांना भेट रविवार, १९ मे, २०१९


जळगाव
: जिल्ह्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई भासू नये यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे महसूल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाणी टंचाई व चारा टंचाई दूर करण्यासाठी श्री.पाटील यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दीपक ठाकूर, चाळीसगाव तालुक्याचे मंडळ कृषी अधिकारी अनिल येवले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील, पारोळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. के. गिरासे, तालुका कृषी अधिकारी एस. एम. लांडगे उपस्थित होते.श्री.पाटील म्हणाले, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 190 गावांमध्ये 171 टँकर सुरु आहेत. यासाठी खाजगी टँकर अधिग्रहीत करण्यात आले आहेत. पाण्याचा नवीन स्त्रोत शोधून टँकर भरण्यासाठी नवीन ठिकाणे सुरु करण्यात आले. तसेच पाणी टंचाई दूर होण्यासाठी टंचाईग्रस्त गावातील टँकरच्या फेऱ्या वाढविणे, तात्पुरत्या नळ पाणी योजना घेणे, खाजगी विहीर अधिग्रहीत करणे यासारख्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. चारा टंचाई भासल्यास चारा उपलब्ध करुन देण्यात येईल. आतापर्यंत जिल्ह्यातून चारा छावणीची मागणी आलेली नाही. मागणी आल्यास स्वयंसेवी संस्था, सामाजिक सस्था, नोंदणीकृत मंडळे यांना चारा छावणीसाठी परवानगी देण्यात येईल. ज्या गावांना पाण्याची टंचाई भासत आहे त्या गावांमध्ये सुरु असलेल्या टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशा सुचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अनोरे या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. फाउंडेशनच्या मदतीने गावातील लोकांनी आपल्या शेतातील पाणी आपल्या शेतात जिरविण्यासाठी कंपार्टमेंट बंडींगची कामे केली. या कामांची पाहणी करुन मंत्री महोदयांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. पाणी फाउंडेशनच्या कामासाठी यंत्रांना लागणारे डिझेल पुरविण्यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री महोदयांनी चाळीसगाव तालुक्यातील हिरापुर, वाघळी पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द मोहाडी, अमळनेर तालुक्यातील मंगरुळ, अनोरे, ढेकू सिम या टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या. यावेळी टंचाईग्रस्त गावाचे सरपंच, माजी सरपंच, नागरिक यांनी पाणी टंचाई संदर्भात आपल्या समस्या मांडल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result