महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजर्षी शाहू महाराज यांचे प्रशासन सर्वांना मार्गदर्शक – र.वी. प्रभूगांवकर गुरुवार, २९ जून, २०१७
पणजी गोवा : राजर्षी शाहू महाराज यांचे प्रशासन हे सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे र.वी. प्रभूगांवकर यांनी सांगितले. महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी, गोवा आणि दलित संघटना गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृती सचिव दौलतराव हवालदार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित संघटना गोवाचे अध्यक्ष शंभूभाऊ बांदेकर हे होते.

शाहू महाराज यांनी स्वतःला समाजकारण आणि राजकारण यांच्याशी बांधून घेतले होते. त्यांनी स्वतःची सत्ता ही समाजाच्या कल्याणासाठी वापरली. तसेच प्रशासनाचा वापर समाज प्रबोधनासाठी केल्याचेही श्री.प्रभूगावकर म्हणाले. त्यांचा काळ हा ब्रिटीश राजवटीचा काळ होता. तसेच त्यांच्या काळात समाजामध्ये जुन्या परंपरा, चालीरिती, अंधश्रद्धा आणि जातियवाद यांचा मोठ्या प्रमाणावर पगडा होता. या सर्वातून समाजाला बाहेर काढण्यासाठी शिक्षण हे महत्वाचे असल्याचे त्यांनी ओळखले आणि त्यासाठी शिक्षणाची दार सर्व समाजासाठी खुली केल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य त्यांनी त्यांच्या संस्थानात केले. तसेच शिक्षण प्रसाराच्या कार्यात कोणताही भेदभाव केला नाही. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये लोकशाही तत्वे लागू केली. त्यांचा अध्यात्मावर विश्वास होता. पण, आपल्या कार्यामध्ये त्यानी अध्यात्मचा अडसर होऊ दिला नाही. त्यामुळेच ते आधुनिक समाजाचे अग्रदूत असल्याचे श्री.प्रभूगावकर म्हणाले. तसेच वेदोक्त प्रकरणामध्ये त्यांचे लोकमान्य टिळकांसोबत वाद झाले. पण, स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी लोकमान्यांना मदत केल्याचेही ते म्हणाले. सर्व समाजाला एकत्र घेऊन प्रशासन चालवले. तसेच उत्तम प्रशासन कसे असावे याचे उदाहरण म्हणजे शाहू महाराजांचे प्रशासन असल्याचे ते म्हणाले. अध्यात्म, धर्म आणि जाती या वैयक्तीत गोष्टी असून त्यांना सामाजिक जीवनामध्ये स्थान नसल्याचे शाहू महाराजांनी कृतीतून दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.हवालदार म्हणाले, शाहू महाराजांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. महात्मा फुले यांनी बहुजन समाजाने पुस्तक व ज्ञान यांची कास धरावी असे सांगितले होते. ते कृतीत उतरविण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. वसतीगृहाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. तसेच आरक्षण देणारे शाहू महाराज हे देशातील पहिले संस्थानिक होते. त्यांनीच देशात आरक्षणाचा पाया रचल्याचे व त्याचे महत्व ओळखल्याचे श्री.हवालदार यांनी सांगितले. तसेच शाहू महाराजांनी अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी मोठी तरतूद केल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बांदेकर म्हणाले, शाहू महाराजांनी १८ पगड जातींना, दिन दलितांना सोबत घेऊन कार्य केले. जाती गाडून टाकण्याचे कार्य शाहू महाराजांनी सुरू केले. तसेच शिक्षणातून मोठी क्रांती केल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी केले. तर श्रीमती अश्विनी मोचेमाडकर आणि महेश मोचेमाडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमानिमित्त गुरुनाथ पै, गोवा राज्याचे माहिती व प्रसिद्ध खात्याचे अधिकारी जॉन अगियार, सुभाष हळर्णकर, दामोदर कुडाळकर आणि सुनिल मोचेमाडकर उपस्थित होते. तसेच या प्रसंगी दलित संघटना गोवाच्या वतीन १० वी व १२ वीमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result