महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
संवादपर्व उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी - सचिन कवले सोमवार, ०४ सप्टेंबर, २०१७
ओम शिवशंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळात आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन

सांगली :
जिल्हा माहिती कार्यालयाच्या संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. या माध्यमातून विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे, असे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले.

येथील ओम शिवशंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अवयव प्रत्यारोपण समन्वयक तथा नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, माती परीक्षण विभागाचे पी. पी. कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सुधाकर पाटील, सुरेश पाटील, दगडू कुंभार, संजय काळोखे, विवेक माने उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी यावेळी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक योजनांची माहिती दिली. यामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती, वसतिगृह, आश्रमशाळा, निवासी शाळा, बचतगट, गटई स्टॉल, औद्योगिक सहकारी संस्थांसाठीच्या योजना, जाती पडताळणी कार्यालय अशा योजनांचा समावेश आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयाचे अवयव प्रत्यारोपण समन्वयक तथा नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे यांनी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसह अवयवदानाची माहिती दिली. अवयवदान ही काळाची गरज आहे. एका मृतमेंदू व्यक्तीचे सात ते आठ अवयव दुसऱ्या व्यक्तिला देता येतात. अवयवदानाने तितक्या लोकांचे प्राण वाचविले जातात. सांगली जिल्ह्यात नेत्रदानामुळे गेल्या काही वर्षांत 935 जणांना दृष्टी मिळाली आहे. यावेळी अवयवदानाच्या अर्जांचे वाटप करण्यात आले. व अवयवदानाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला.

माती परीक्षण विभागाचे पी. पी. कुंभार म्हणाले, आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, त्याचप्रमाणे जमिनीच्या आरोग्याची काळजीही घ्यायला हवी. सकस धान्य उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता चांगली हवी. माती परीक्षण मोहिमेचे हे तिसरे वर्ष आहे. भविष्यकाळातील पिढीसाठी सुपीक जमीन राहण्यासाठी सर्वांनी मातीपरीक्षणाचा संकल्प करूया.

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तर श्रीमती कुंभार यांनी आभार मानले. यावेळी ओम शिवशंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी, नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result