महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कलापथकाद्वारे प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जिल्हाभरात प्रसिद्धी शुक्रवार, १७ मार्च, २०१७
  • लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
  • आठ कलापथकांचा सहभाग
  • मनोरंजनाबरोबरच मुद्रा योजनेची दिली माहिती
सांगली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कलापथकांच्या कार्यक्रमांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती गरजू, होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना व्हावी, या हेतूने दिनांक 10 ते 15 मार्च 2017 या कालावधीत हे कार्यक्रम जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील ठराविक गावांमध्ये घेण्यात आले. समाजातील सर्व घटकांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सुरू केली आहे. लोककलेच्या माध्यमातून सादर केलेले हे कार्यक्रम माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या गीत व नाट्य विभागाच्या शासनमान्य यादीवर जिल्ह्यातील आठ कलापथके आहेत. त्यांनी आपल्या कलेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत या योजनेची माहिती दिली.

या कार्यक्रमांतर्गत जयहिंद लोकनाट्य संस्था, अंकलखोप कलापथकाद्वारे वाळवा तालुक्यातील वाळवा, जुनेखेड, नवेखेडे, बोरगाव, फार्णेवाडी, साटपेवाडी, बणेवाडी आणि मुसुचीवाडी येथे, शिवा-संभा वाघ्या मुरळी बहुउद्देशिय संस्था, सांगली कलापथकाद्वारे कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग, खरसींग, बनेवाडी, हरवली गोरगाव, शिरढोण, हिंगणगाव, करोली तसेच जत तालुक्यातील कोकळे, डफळापूर, बागेवाडी, कंटी, बेळंकी, अंकले, बाज व डोरली येथे, शाहीर देवानंद माळी सहकारी, सांगली कलापथकाद्वारे खानापूर तालुक्यातील शेडगेवाडी, धाडेवाडी, मोही, जाधववाडी, खानापूर, सुलतानगादे, मेगाणवाडी आणि भडकेवाडी, आशाबी मुल्ला आणि पार्टी रामानंदनगर, ता. पलूस कलापथकाद्वारे आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, हिवतड, गोमेवाडी, करगणी, तडवळे, बनपुरी, भिंगेवाडी व आटपाडी या गावांमध्ये शाहिरांनी लोककलेच्या माध्यमातून प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती दिली.

तसेच, शाहीर पवार कला व सांस्कृतिक मंडळ, रेठरेधरण कलापथकाद्वारे शिराळा तालुक्यातील मणदूर, आरळा, चरण, नाठवडे, खुजगाव, येळापूर, मेणी आणि खिरवडे या गावांमध्ये, शाहिरी लोककला सांस्कृतिक विकास केंद्र मिरजवाडी कलापथकाद्वारे तासगाव तालुक्यातील निमणी, नागाव, नेहरूनगर, तुरची, कौलगे, वाघापूर, खुजगाव आणि सावळज येथे, शाहीर बजरंग अंबी, तुंग कलापथकाद्वारे कडेगाव तालुक्यातील रमापूर, देवराष्ट्रे, वडगाव, हिंगणगाव बुद्रुक, शिवणी, वडियेरायबाग, अमरापूर व आंबेगाव, तर पलूस तालुक्यातील वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, येळावी, सांडगेवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडी आणि खंडोबाचीवाडी येथे, शाहीर आदिनाथ बापुराव विभूते, बुधगाव कलापथकाद्वारे मिरज तालुक्यातील सोनी, भोसे, कारंदवाडी, सावळी, मालगांव, खंडेराजुरी, कळंबी आणि सिद्धेवाडी या गावांमध्येही प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती देण्यात आली.

या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरू बेरोजगारांना कर्जपुरवठा करून त्यांचे जीवन उंचावण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेंतर्गत शिशु गटामध्ये 10 हजार ते 50 हजार, किशोर गटामध्ये 50 हजार ते 5 लाख, तरूण गटामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज घेता येते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result