महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५३ प्रभागांकरिता आरक्षण सोडत जाहीर शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०१७
महिलांसाठी २७ जागा आरक्षित

ठाणे:
ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५३ प्रभागांकारिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागस प्रवर्गासाठी तसेच सर्व गटात महिलांसाठीची आरक्षण सोडत आज नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या सोडतीत एकूण २३ प्रभाग खुल्या गटासाठी, त्यापैकी ११ प्रभाग खुल्या गटातील महिलांसाठी ३ प्रभाग अनुसूचित जाती व त्यातील २ अनुसूचित जाती महिलांसाठी, १३ प्रभाग अनुसूचित जमाती व त्यातील ७ महिलांसाठी तसेच इतर मागास प्रवर्गासाठी १४ आणि त्यातील ७ या प्रवर्गातील महिलांसाठी अशा २७ महिला आणि २६ पुरुष अशा एकूण ५३ जागांसाठी आज सोडत काढण्यात आली. ही सोडत चिठ्ठ्यांच्या सहाय्याने शाळकरी मुलांच्या हस्ते काढण्यात आली.

या सोडतीत खालीलप्रमाणे प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले

अनुसूचित जाती : म्हारळ (ता.शहापूर) आणि कांबा (कल्याण) अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव, वासिंद (शहापूर) अनुसूचित जातींसाठी खुले

अनुसूचित जमाती:
मोखावणे, साकडबाव, आवाळे, डोळखांब (शहापूर), मोहंडूळ,खारबाव (भिवंडी), वैशाखरे (मुरबाड) हे प्रभाग अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव. तर सांबे, गणेशपुरी (भिवंडी), शिरोळ, बिरवाडी (शहापूर), माळ, शिरवली (मुरबाड) हे प्रभाग अनुसूचित जमातीसाठी खुले.

नागरिकांचा मागासवर्ग : किन्हवली (शहापूर), देवगाव (मुरबाड),घोटसई, मांजर्ली (कल्याण), लोनाड, खोणी, (भिवंडी), चरगाव (अंबरनाथ) हे प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गातून महिलांसाठी राखीव तर मळेगाव (शहापूर), आंबाडी, महापोली, शेलार, कारिवली, काल्हेर, पूर्णा ( भिवंडी) हे प्रभाग नागरिकांच्या मागासवर्गांसाठी खुले

खुला गट : गोठेघर, नडगाव (शहापूर), सरळगाव (मुरबाड), खडवली (कल्याण), बोरीवली तर्फे राहुर, पडघा, कवाड खु., राहनाळ, रांजनोळी (भिवंडी), वाडी, वांगणी (अंबरनाथ) हे प्रभाग खुल्या गटातील महिलांसाठी राखीव. तर आसनगाव, चेरपोली, सोगाव (शहापूर), उडवली, डोंगरन्हावे (मुरबाड), खोणी (कल्याण), दाभाड, काटई,अंजूर, कोन (भिवंडी), नेवाळी (अंबरनाथ) हे सर्वांसाठी खुले प्रभाग असतील.

हरकती व सूचना दाखल करू शकता
आजच्या या आरक्षण सोडतीनंतर हरकती व सूचना असतील तर त्या ६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत तहसीलदार सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी लिखित स्वरूपात सादर करण्यात यावे असे याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सांगितले. पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी देखील आज शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ येथे नागरिकांच्या उपस्थितीत विशेष सभा झाल्या. ही सोडत यशस्वी करण्यासाठी तहसीलदार स्मिता मोहिते, समीर घारे, तसेच निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result