महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
क्षयरोग निर्मूलनाकरिता सर्वांचा सहभाग आवश्यक - राज्यमंत्री सदाशिव खोत बुधवार, २४ जानेवारी, २०१८
सांगली : क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची महत्त्वाची समस्या आहे. देशात दरवर्षी 29 लाख नवीन क्षयरूग्ण सापडतात. त्यापैकी 4 लाख 20 हजार क्षयरोगी दरवर्षी दगावतात. तसेच, यातून दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि संपूर्ण औषधोपचाराची आवश्यकता आहे. क्षयरोग निर्मूलनाकरिता सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेते यांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.राजाभाऊ येवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सुजाता जोशी आदि उपस्थित होते.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सांगली जिल्ह्यात सीमाभागातील रूग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आढळलेल्या क्षयरोग रूग्णांमध्ये सीमाभागातील रूग्णांचाही समावेश असू शकतो. त्या छुप्या रूग्णांचा शोध घेणे गरजेचे आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व इतरांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांनी क्षयरूग्णांची माहिती द्यावी, असे त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, अपुऱ्या व अर्धवट औषधोपचारामुळे औषधाला दाद न देणारा क्षयरोग होऊ शकतो. केंद्र शासनाने सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण अपेक्षित क्षयरूग्णांपैकी दीडपट क्षयरूग्ण खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे औषधोपचार घेतात. या रूग्णांची नोंदणी आरोग्य खात्याकडे होणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या आदेशानुसार खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेत्यांनी क्षयरूग्णांची माहिती आरोग्य खात्यास कळविणे बंधनकारक आहे. तरी संबंधितांनी या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत व डॉ. राजाभाऊ येवले यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहिमेमध्ये सहकार्य केलेल्या तसेच सन 2017 मध्ये जिल्ह्यातून जास्तीत जास्त क्षयरूग्णांची माहिती दिलेल्या डॉक्टरांचा कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुजाता जोशी यांनी केले. सूत्रसंचलन पी. एन. काळे यांनी केले. डॉ. मिलींद गेजगे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. माधव ठाकूर, डॉ. रविंद्र ताटे, सागर भोरे यांच्यासह खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, औषधे विक्रेते, आयएमएचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result