महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्य शासनातर्फे कोथळे कुटुंबियांना दहा लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७
चौकशीमध्ये कुचराई करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पालकमंत्री देशमुख यांचे संकेत
सांगली :
अनिकेत कोथळे प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर, चौकशीमध्ये कुचराई करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांनी अर्ज केल्यानंतर भविष्यात शासकीय नोकरीमध्ये जागा निर्माण झाल्यावर प्राधान्यक्रमाने त्याचा विचार केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे अनिकेत कोथळे प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि.ना.काळम, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दल देशामध्ये गौरविले गेले आहे. मात्र, या घटनेमुळे पोलिसांचेही खच्चीकरण झाले आहे. पोलिसांचे खच्चीकरण होऊ नये, त्याचबरोबर गुन्हेगारांनाही कुठल्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राज्य शासन आवश्यक उपाययोजना करेल. अनिकेत कोथळे प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर म्हणाले, कोथळे कुटुंबियांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. अनिकेत कोथळे कुटुंबियाच्या बहुतांश मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक कार्यवाही केली आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी संमती दिली आहे. तसेच, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील. अनिकेतच्या आईवडिलांच्या डीएनए चाचणीसाठी रक्त संकलन केले आहे. अशा बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी याप्रकरणी आवश्यक पुराव्यांचे संकलन सुरू आहे. संशयितांचीही चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणाचा नियमाप्रमाणे तपास करण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सी.आय.डी.) सक्षम आहे. या प्रकरणी सांगलीकरांनी शांततेचे पालन करत चांगला प्रतिसाद दिला. गुन्हेगारांना कुठल्याही दबावाशिवाय शिक्षा देण्यासाठी हे सहकार्य मोलाचे ठरणार आहे, असे ते म्हणाले.

राज्य शासनातर्फे कोथळे कुटुंबियांना दहा लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान

अनिकेत कोथळे प्रकरण अशोभनीय आहे. या प्रकरणात राज्य शासन आणि पालकमंत्री म्हणून मी व्यक्तिशः कोथळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. याची गंभीर दखल घेत, राज्य शासनाने कोथळे कुटुंबियांना काल दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख आणि गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्याहस्ते आज अनिकेत कोथळेच्या पत्नी संध्या व कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आली.

अनिकेत कोथळे याच्या कुटुबियांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि.ना.काळम, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, नीता केळकर, अनिकेतची आई, भाऊ आशिष कोथळे, पत्नी संध्या व अन्य कुटुंबिय उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result