महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील पहिले वैज्ञानिक विचारवंत – वल्लभ गांवस सोमवार, १७ एप्रिल, २०१७
पणजी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गौतम बुद्धानंतरचे पहिले वैज्ञानिक विचारवंत असल्याचे वल्लभ गांवस देसाई यांनी सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र परिचय केंद्र आणि दलित संघटना गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते. शिक्षक, पत्रकार, वकील तथा विचारवंत असलेले श्री.गांवस देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित संघटना गोवाचे अध्यक्ष शंभूभाऊ बांदेकर हे होते.

डॉ.आंबेडकर हे सर्वगुण संपन्न, विद्वान, प्रकांड पंडित, तेजस्वी, स्वयंभू, निश्चयाचा महामेरू होते. नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ.आंबेडकर असल्याचे श्री.देसाई म्हणाले. डॉ.आंबेडकर हे कोणत्याही गोष्टीचा विचार हा वैज्ञानिक दृष्टीकोनातून करत असत असंही ते म्हणाले. डॉ.बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला विठ्ठल मंदिरातील दर्शनापासून परावृत्त केल्याचे सांगताना त्यातून त्यांचा स्वाभिमान दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्यांच्या काळातील सर्व नेत्यांमध्ये ते बुद्धीने व कर्तृत्वाने मोठे असल्याचेही श्री.देसाई म्हणाले. तसेच डॉ.आंबेडकर हे मोठे अर्थतज्ज्ञ असल्याचेही त्यांनी सांगितले. अस्पृष्यांना हिंदू धर्मात स्थान मिळविण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे झगडा दिला. त्यांच्या इतकी मोठी चळवळ इतर कोणत्याही नेत्यांने उभारली नाही असेही ते म्हणाले. तसेच डॉ.आंबेडकर हे फक्त दलितांचे नाही तर संपूर्ण देशाचे नेते होते. भारताचे भूषण होते असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शंभूभाऊ बांदेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असल्याचे सांगितले. तसेच एक अर्थतज्ज्ञ, लेखक या सोबतच ते एक चांगले वाचक असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमावेळी सौ.अश्विनी मोचेमाडकर, समर्थ नाटेकर आणि सुभाष बांदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result