महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणी संचय हीच विकासाची गुरूकिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, १९ मे, २०१७
सांगली : राज्यात जलयुक्त शिवाराची चांगली कामे होत आहेत. अनेक ठिकाणी लोक श्रमदान करून आपल्या गावाचा कायापालट करीत आहेत. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जलसंवर्धन व जलसाठे निर्माण करू तेवढी समृद्धी आपल्यापर्यंत पोहोचेल. पाणी संचय हीच विकासाची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मिरज तालुक्यातील आगट तलावातील लोकसहभागातून गाळ काढलेल्या कामाच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, आमदार सुधीर (दादा) गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी अतिशय उत्तम जलव्यवस्थापन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जलव्यवस्थापन हे आजही जगातले सर्वोत्तम जलव्यवस्थापन समजले जाते. अनेक संस्थानिकांनी, राजांनी अतिशय चांगल्या निसर्गाचा अभ्यास करून तसेच पाण्याच्या शास्त्राचा अभ्यास करून तलावाची निर्मिती केली. आगट तलाव हा त्यापैकीच एक तलाव आहे. या तलावातून ग्रॅव्हीटीच्या माध्यमातून 16 हौदांपर्यंत पाणी नेण्याचे काम केले जायचे. डोंगरावरील सर्व पाणी जमा होईल अशा प्रकारची या तलावाची व्यवस्था होती. गाळ व अतिक्रमाणामुळे निसर्गाने निर्माण केलेली ही व्यवस्था लुप्त झाली असून या तलावातील मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून हा तलाव पुनरूज्जीवीत करता येईल. या तलावाची शास्त्रशुद्ध बांधणी कुठेही खराब न करता त्यामाध्यमातून पाण्याचे स्ट्रक्चर निर्माण केले जाईल. वॉटरशेड व्यवस्थित ठीक करणे हा एक यातील महत्त्वाचा भाग आहे, आणि त्या माध्यमातून पाण्याचा संचय होण्याबरोबरच इथल्या भूगर्भातील पाणी देखील वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आगट तलावाचे चांगले काम हाती घेतल्याबद्दल त्यांची सर्वांचे अभिनंदन केले.

आगट तलाव ही एक ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना आहे. सुमारे 150 वर्षापूर्वी मिरजेचे तत्कालीन राज्यकर्ते श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांनी सन 1866 साली मिरज गावाला भूमिगत ओतीव लोखंडी नळाद्वारे सायफन पद्धतीने पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेली ही संस्थानकालीन योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान गाळमुक्त तलाव योजनेंतर्गत लोकसहभागातून ऐतिहासिक आगट तलाव गाळमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे.

तलावाचे पाणलोट क्षेत्र 3 हे. 97 आर आहे. विद्यमान पाणीसाठा 120 एमएलडी असून अंदाजे काढला जाणारा गाळ 39 हजार क्यु.मी. इतका आहे. गाळकाढणीनंतर वाढणारा पाणीसाठा 39 एमएलडी इतका आहे. 4 पोकलेन, 2 जेसीबी इतकी उत्खनन यंत्रे व 30 डंपर्स वाहतूक वाहने लावण्यात आली आहेत. कामाचा चालू डीएसआर प्रमाणे अंदाजे खर्च 78 लाख इतका आहे. शासनामार्फत करावयाचा बंधारा लिकेज दुरूस्तीसाठीचा प्रस्तावीत अंदाजे खर्च 20 लाख इतका आहे. गाळ पसरले जाणारे शेतीक्षेत्र 20 हेक्टर आहे.

आगट तलावाच्या गाळमुक्तीमुळे लगत शेती क्षेत्रास व या परिसरातील पाण्याचे जलस्त्रोत वाढण्यासाठी मदत होणार आहे. यामधील सुमारे तीन ते चार फूट खोलीने गाळ काढून तलावाचे खोलीकरण केल्यास सुमारे 36 एमएलडी इतका अतिरिक्त पाणीसाठा या भागास उपलब्ध होऊ शकेल. तसेच येथून काढलेला गाळ शेजारील शेतीत वापरल्यामुळे सुमारे 50 एकरहून अधिक क्षेत्र सुपीक होऊ शकते व याचा उपयोग उत्पादन वाढीसाठी निश्चित होऊ शकतो. हे काम संपूर्ण लोकसहभागातून सुरू असून त्याची धुरा व आर्थिक पाठबळ प्रणव बिल्डकॉन व डेव्हलपमेंट फोरम सांगली-मिरज या अशासकीय संस्थांनी घेतले आहे. आगट तलावाचे गाळमुक्तीकरणाचे हे काम एक महिन्यात दिनांक 25 जून 2017 पूर्वी करण्याचा प्रयत्न आहे. येथील धरण भिंतीचे लिकेज काढण्याचे शासन स्तरावर निश्चित झाले असल्यामुळे पाणीसाठा शेवटपर्यंत टिकून होणाऱ्या पाणीसाठ्याचा चांगला उपयोग होईल. संस्थान रेकॉर्डनुसार सन 1922 साली आगट तलावातील गाळ प्रथम काढण्यात आला होता. यासाठी 14 हजार रूपये खर्च आला होता.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result