महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लाभार्थी मेळावे सुशिक्षीत बेरोजगारांसाठी दिशादर्शक - आमदार शिवाजीराव नाईक शनिवार, १८ मार्च, २०१७
सांगली : शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याने सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. या बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. अशा संधींची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले लाभार्थी मेळावे दिशादर्शक ठरतील, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा येथे आयोजित लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, प्राचार्य एस. आय. भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, विद्यार्थी दशेमध्येच रोजगार व स्वयंरोजगाराबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले तर भावी काळात विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य संधी उपलब्ध होतील. आणि असे तरूण आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहून जीवनात यशस्वी होतील. करिअरच्या संधी प्रचंड प्रमाणात उपलब्ध असून अशा संधींची माहिती असणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी एकाच व्यासपीठावर शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती मिळणे ही आता काळाची गरज ठरली आहे. ही काळाची गरज ओळखूनच जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.

अशा मेळाव्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यानींही आधुनिक ज्ञान आत्मसात करून घेऊन पारंपारिक उद्योगधंद्याना फाटा देऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. नवीन उद्योगधंदे उभे करण्यासाठी शासनामार्फत बँकाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कर्ज योजना उपलब्ध झाल्या आहेत. आज शासन आपल्या दारी आलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून अशी सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारे जिल्हा माहिती कार्यालय अभिनंदनास पात्र असल्याचे शेवटी ते म्हणाले.

माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, पूर्वीच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक पडला आहे. पूर्वी करिअरच्या संधी अल्प प्रमाणात उपलब्ध होत्या. पण आता यामध्ये बदल होऊन या संधी आपल्या दारावर टकटक करीत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने लाभार्थी मेळाव्यांचा लाभ घेऊन आपण प्रगती करणार असे मनावर बिंबवून घेतले पाहिजे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लाभार्थी मेळाव्यांचे आयोजनही रोजगार व स्वयंरोजगार व सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासकीय योजनांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी सुवर्णसंधी आहे.

प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर म्हणाल्या, या मेळाव्यांमध्ये अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना तसेच प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती देण्यात येत आहे. तसेच, या मेळाव्यात महसूल, कृषि, पशुसंवर्धन शिक्षण अशा विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांची माहितीही देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या वतीने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेऊन अनेकांनी आपली प्रगती साधली आहे. या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत अधिकाधिक पोहोचाव्यात, यासाठी या लाभार्थी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक एन. एस. पाटील, सामाजिक न्याय विभागाचे निरीक्षक रवींद्र कुमठेकर, कृषी विभागाचे अनिकेत माने, महसूल विभागाचे सुहास घोरपडे, बँक ऑफ इंडियाचे समुपदेशक पी.आर.मिठारे यांनी आपआपल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती कार्यालयाचे रणजित पवार यांनी केले. आभार प्राचार्य एस. आय. भोसले यांनी मानले.

या मेळाव्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result