महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हाधिकारी यांनी घेतला निवडणूकीचा आढावा शुक्रवार, १५ मार्च, २०१९


चंद्रपूर :
निवडणुकीच्या कालावधीत मतदान शांततेत आणि नियोजनबध्द रितीने पारपाडावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. या दृष्टीकोनातून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक यंत्रणेसोबत आज १५ मार्च रोजी २० कलमी सभागृहात चार तासाची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भाने विविध विषयावर तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. सोबतच निवडणुकीसंदर्भात सूक्ष्म नियोजन करण्यात आले. तसेच निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावर कुठालाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामध्ये वाहतूक व्यवस्था, मतदान केंद्रानुसार नकाशा आखणे, साहित्य वाटप, निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणे, पोलीस नियत्रंण व्यवस्था इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

निवडणुकीच्या कामकाजाकरिता शासकीय वाहनाचा वापर करीत असतांना वाहतूक परवाना संदर्भात विशेष काळजी घ्यावी. तसेच मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करण्यासाठी कुठलीही अडचण येवु नये यासाठी प्रत्येक सुचनेचे माहिती फलक लाऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. शिक्षक तथा मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्याच प्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रानुसार मार्गदर्शक नकाशे तयार करावे.

मतदानाच्या दिवशी मतदान सुरळीत पार पाडावे. याकरिता मतदानासाठी लागणारे सर्व साहित्यांची पडताळणी आणि शाहानिशा करुनच घेण्याची सूचना आजच्या बैठकीत करण्यात आली.

मतदान केंद्रावरील संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील मतदान आणि मतदाराविषयी अद्ययावत माहिती असावी. जसे एकूण मतदार, पुरुष, स्त्री इत्यादी. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या लगत असणारे जिल्हे आणि तालुके यामध्ये पोलीस अधिकारी यांचा संपर्क क्रमांक ठेवून कायदा, सुव्यवस्थेची काळजी घेण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे कुठेही उल्लंघन होवू नये याकरिता पेड न्यूजकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसिलदार व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result