महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहीद जवान अनिल गोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९
पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली




शिर्डी :
शहीद जवान अनिल गोरे अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय.. वंदे मातरम्.. या घोषणांनी राजुरी गावचे वातावरण देशभक्तीमय झाले. जम्मू व काश्मीरमधील लडाख येथे राजुरी, ता. राहाता येथील अनिल विष्णू गोरे हे जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी राजुरी येथे शासकीय तथा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती सपना, मुलगी अंकिता, आई रंजना, वडील विष्णू आणि भाऊ सुनिल गोरे, वहिनी शितल असा परिवार आहे.

राजुरी येथील प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सर्वश्री शिवाजीराव कर्डीले, भाऊसाहेब कांबळे, सरालाबेटचे मठाधिपती रामगिरी महाराज, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, उपविभागीय प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार माणिक आहेर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल आर. आर. जाधव यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व शहीद अनिल गोरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश कुटुंबियांना सुपूर्द केला. शहीद जवान यांना सैनिक दलातील तुकडीने हवेत बंदुकीने तीन फैरी झाडून आदरांजली दिली.

शहीद जवान अनिल गोरे यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. पुणे येथून वाहनाने त्यांच्या मूळ गावी आणून गावातून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संपूर्ण गाव यावेळी शोकाकूल झाले होते. गावकऱ्यांनी भावूक वातावरणात साश्रूनयनांनी शहीद अनिल गोरे यांना अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी, पोलीस दलाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ, नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result