महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवार, २६ जानेवारी, २०१९

परभणी येथे  मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्नपरभणी : जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात आली असून काही कामे सुरु आहेत. सर्वांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत, असे  प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार मोहन फड, महापौर मिनाताई वरपुडकर, जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की,  जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मागील चार वर्षात जिल्ह्यातील निवडलेल्या 582 गावांपैकी 419 गावातील 10 हजार 839 कामे पूर्ण करण्यात आली असून 683 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामावर सुमारे 157 कोटी 79 हजार रुपये खर्च झाले असून 66 हजार 403 टिसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील शेतमाल थेट बाजारपेठेत विक्री करता यावा याकरीता परभणी शहरात नुकताच संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजारास सुरुवात करण्यात आली असून यासारखे आणखी बाजार सुरु करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 55 हजार 121 लाभार्थ्यांना 885 कोटी 38 लाख रुपये कर्जमाफी म्हणून वाटप करण्यात आले असल्याचे सांगून यावर्षी 12 लाख वृक्षलागवड करण्याचा निर्धार जिल्ह्याने केला असल्याने प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणसाठी या वनीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील शहीद जवानांच्या पत्नीस किंवा कायदेशीर वारसांना शासकीय जमीनीचे वाटप करण्यात  आले यामध्ये शहीद जवान शुभम मुस्तापरे यांच्या वीरमाता श्रीमती सुनिता मुस्तापुरे यांना 1 हेक्टर 23 आर, शहीद बालाजी अंभोरे यांच्या वीरपत्नी श्रीमती अंजना अंभोरे यांना 2 हेक्टर , शहीद अक्षय गोडबोले यांच्या वीरमाता श्रीमती सुनिता गोडबोले यांना 2 हेक्टर आणि शहीद गणेश शहाणे यांच्या वीरपत्नी श्रीमती अनुराधा शहाणे यांना 2 हेक्टर जमीनीचे वाटप पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी शाळा, बॉम्ब नाशक पथक, मोबाईल फॉरेन्सीक लॅब, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, यांनी परेड संचालनातून मानवंदना दिली तसेच आरोग्य, कृषी, स्वच्छ भारत मिशन, महानगरपालिका, शिक्षण, कुष्ठरोग निर्मूलन, महिला व बालविकास या विभागांनी देखाव्यावर चित्ररथ सादर केले.  यावेळी जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा तसेच दिव्यांग व्यक्ती, खेळाडू, पोलीस, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result