महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांचे अडचणींचे निराकरण करण्यास कटिबद्ध- सुभाष देशमुख रविवार, ०८ एप्रिल, २०१८
खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत घेतला कृषि सज्जतेचा आढावा

सांगली :
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा वेळीच पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी. भेसळयुक्त बियाणे देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, शेतकऱ्यांना बियाणे, खतपुरवठा, पाणी आणि विजेची सुविधा, उत्पादित मालाला चांगला हमीभाव दिल्यास येथील शेतकरी समृद्ध होईल. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामपूर्व बैठकीत बी-बियाणे, खते यांचा आढावा घेतला असून खरीप हंगामासाठी जिल्ह्याची सज्जता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यास आपण कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

कृषि विभागाच्या वतीने सांगली जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा व सन 2018-19 नियोजन बैठकीत श्री.देशमुख बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, सर्वश्री आमदार शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची तसेच कृषिविषयक विविध योजनांची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. ज्या भागात जी पिके पिकतात त्यानुसार खरेदी केंद्रे सुरू करावीत. महावितरणने प्रलंबित कृषि पंप वीज जोडण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. शेतकऱ्यांची हेतुपुरस्पर अडवणूक आणि फसवणूक करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्यांची तसेच त्यांच्या कंपन्यांची गय करू नका, असा इशारा दिला. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे, खतांचा पुरवठा तसेच पीक कर्जाचे वितरण व्हावे, असे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर यांनी मौलिक सूचना केल्या. या बैठकीत गत खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीतील मुद्दे व त्यावरील कार्यवाही, गोपीनाथ मुडे शेतकरी अपघात विमा योजना, बियाणे व खत पुरवठा, विस्तार योजनेंतर्गत पीक उत्पादकता, कृषि यांत्रिकीकरण, गुणवत्ता नियंत्रण, मृद आरोग्य अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, द्राक्ष निर्यात, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, शेतकरी गट, उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पीक कर्ज पुरवठा, प्रलंबित कृषि पंपाना विज जोडणी, शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती अभियान आदि योजनांचा आढावा घेण्यात आला.

प्रारंभी श्री.साबळे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात जिल्ह्यातील खरीप हंगाम 2017 चा आढावा आणि खरीप हंगाम 2018च्या नियोजनाबाबतची, कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार रमेश विलास जाधव (येलुर, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार कै. माधवराव दत्ताजीराव पाटील यांचे वारस मोहन माधवराव पाटील (कांदे, ता. शिराळा) यांना प्रदान करण्यात आला. तसेच जमिन आरोग्य पत्रिकांचे वाटप व कृषि दिनदर्शिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन प्रवीण बनसोडे यांनी केले तर आभार प्रकल्प संचालक (आत्मा) सुरेश मगदूम यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result