महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्य शासनाचे उत्कृष्ट मुखपत्र - महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील सोमवार, ३१ जुलै, २०१७
नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या लोकराज्य मासिकाचे कोकणातील जनतेने वर्गणीदार व्हावे, असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी केले.

विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यामार्फत लोकराज्य वार्षिक वर्गणीदार मोहीमनिमित्त विभागीय माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या लोकराज्य घडीपुस्तिकेचे प्रकाशन डॉ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे हे उपस्थित होते.

डॉ.पाटील म्हणाले की, लोकराज्य मासिक शासनाच्या योजना नागरीकांपर्यंत पोहोचविणारे एक उत्कृष्ट साधन आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी वार्षिक वर्गणीदार मोहीम हा चांगला उपक्रम आहे.

लोकराज्य मासिक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, उर्दू या पाच भाषांमधून दरमहा प्रकाशित होते. शासनाच्या या मासिकाचे वर्गणीदार जास्तीत जास्त लोकांनी व्हावे यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेची सुरुवात दि. 1 ऑगस्ट 2017 पासून रोहा जि.रायगड येथून होणार आहे, अशी माहिती यावेळी डॉ.मुळे यांनी यावेळी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result