महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा - आयुक्त डॉ.म्हैसेकर शुक्रवार, ०३ मे, २०१९

पुणे : यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. या टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी डॉ.म्हैसेकर यांनी प्रत्येक जिल्हा निहाय टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन मित्तल, सांगलीचे प्रभारी विक्रांत बगाडे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी पाण्याची मोठी समस्या आहे. या कालावधीत पुणे विभागातील 677 गावे व 4258 वाड्यावस्त्यांवरील 12 लाख 38 हजार 250 लोक बाधीत झाले आहेत. तर 3 लाख 72 हजार 844 पशुधन बाधीत आहे. ही संख्या खूपच मोठी असून 43 शासकीय व 761 खजगी अशा मिळून 804 टँकर्सच्या माध्यमातून पुणे विभागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 211 गावे तर 1410 वाड्या वस्त्या बाधीत आहेत. तर सातारा जिल्ह्यात 3 लाख 18 हजार 658 आणि सांगली जिल्ह्यातील 54 हजार 186 पशुधन बाधित आहे.

पुणे विभागात टंचाईचा सामना करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, नगरपालिका हद्दीतील प्रगतीपथावरील योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना करणे, विहिरी खोल करणे, त्यांच्यातील गाळ काढणे या उपायोजना करण्यात येत आहेत. टंचाईचा सामना करण्यासाठी या कामांना वेग देणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना, आणि त्यांच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result