महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा शनिवार, २२ जुलै, २०१७
माहुली, भातसा, तानसा परिसरात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश

ठाणे
: पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून ५ दरवाजे एक मीटरने उघडले आहेत. भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पा. सोनवणे यांनी यासंदर्भात शहापूर, भिवंडी, कल्याणच्या तहसीलदारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत, असे प्रांताधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी सांगितले आहे.

यामुळे शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला व धबधबा, विहीगाव येथील अशोका किल्ला, भातसा व तानसाच्या ५०० मीटर परिसरात पर्यटकांना जाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे. शुक्रवार सकाळी ९ पासून भातसा धरणाची पातळी १३४.७६ मीटर एवढी झाली. धरणाची पाणी पातळी जलाशय प्रचालन सुचीनुसार नियमित ठेवण्यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडावे लागणार असून परिणामत: भातसा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो.

भातसा नदीच्या आसपासच्या गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये तसेच अधिक काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शनिवार आणि रविवारची गर्दी लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आला आहे. माहुली येथे काही दिवसांपूर्वीच २ युवकांचा धबधब्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. धरणाचा पाणीसाठा वाढला की धरणाचे दरवाजे यांत्रिकरित्या आपोआप उघडले जातात, परिणामत: धबधब्यांच्या ठिकाणी पाण्यात अचानक मोठी वाढ होऊन पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

या प्रतिबंधात्मक आदेशामुळे आता या परिसरांतील धबधब्यात पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पाण्यात उतरणे, ५०० मीटर परिसरात वाहने घेऊन जाण्यास बंदी राहील. पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी किंवा कठड्यांवरून मोबाईलद्वारे सेल्फी काढणे, छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करणे, याठिकाणी मद्यप्राशन करणे, मद्य बाळगणे यास पुढील आदेश होईस्तोवर बंदी आणण्यात आली आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result