महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणीपुरवठा व जलसंधारणाच्या कामांना वेग द्या - मुख्यमंत्र्यांचे निर्देश शनिवार, ११ मे, २०१९


मुख्यमंत्र्यांचा जळगाव जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद

मुंबई : टँकरची मागणी केलेल्या टंचाईग्रस्त गावांना तत्काळ 2 दिवसात पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, तसेच दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जिल्हा प्रशासनाला केल्या. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान येथून 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली, तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. मात्र स्थानिक पातळीवर या मागण्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घ्यावी, प्रत्यक्ष भेटी देऊन स्थानिक पातळीवर असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी केल्या. बोदवड तालुक्यातील सरपंचांनी पाणीटंचाईबाबात विविध मागण्या केल्या. त्यावर जलसंधारणांच्या विविध कामांसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री यांनी केल्या. यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावावर 48 तासांत कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

सरपंचांनी माणसांसमवेत गुरांच्या पाण्याचीही काळजी घ्यावी, अशी सूचना केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, माणसांसोबतच गुरांनाही पाणी दिले जाईल. 2018 ची लोकसंख्या आणि गावातील जनावरांची संख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरचा पाणीपुरवठा वाढविण्यात यावा. आवश्यक तेथे गुरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

टंचाईसंदर्भातील तातडीच्या बाबींवर 48 तासाच्या आत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी, तसेच आजच्या संवादात सरपंचांनी मांडलेल्या मुद्यांवर कार्यवाही करुन तसा अहवाल आपणास सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.   

समाधानाचा संवादसेतू

'ऑडियो ब्रीज' तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधून आपल्या समस्या जाणून घेतल्याचे समाधान जिल्ह्यातील विविध सरपंचांच्या बोलण्यातून झळकत होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. जळगाव जिल्ह्यातील 40 हून अधिक गावच्या सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. काही सरपंचांनी मागण्यांबरोबरच काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या. अंमळनेर तालुक्यातील सरपंच उमेश साळुंके यांनी शासकीय योजना, सेवांचा लाभ घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने किमान दोन वृक्ष लावणे अथवा जगवण्याचे काम केले पाहिजे, शासनाने तसा कायदाच करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुचनेचे स्वागत केले.  

यावेळी मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर तसेच ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. 

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना

• 15 पैकी 12 तालुक्यांत टँकर सुरू. तालुकानिहाय टँकर संख्या पुढील प्रमाणे जामनेर - 33, चाळीसगाव - 30, अंमळनेर-30, पारोळा - 24, पाचोरा- 14, भुसावळ- 7, भडगाव-5, बोदवड-4, एरंडोल - 3, जळगाव - 2, मुक्ताईनगर व धरणगाव प्रत्येकी एक असे एकूण 154 टँकर सुरू.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात 94 विंधन विहिरी व पाच तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 264 विहिरींचे अधिग्रहण.

सर्व नळ पाणीपुरवठा योजनांचा विद्युतपुरवठा सुरळीत. नळ पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयकांची 11.33 कोटी रुपये रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली. 

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ घोषित झालेल्या 13 तालुक्यांतील 1348 गावातील 5,31,150 शेतकऱ्यांना रु. 377.01 कोटी एवढी मदत वाटप.

जिल्ह्यातील 62,825 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. त्यापैकी 20,077 एवढ्या पात्र शेतकऱ्यांना 23.72 कोटी रु. रक्कम अदा.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंर्गत जिल्ह्यातील 1.87 लाख शेतकऱ्यांची नोंदणी. त्यापैकी 38,000 शेतकऱ्यांना रुपये 2000  प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी रुपये 7.59 कोटी इतके अर्थसहाय्य. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात 1351 कामे सुरू. त्यावर 7,546 मजूर उपस्थित. जिल्ह्यात 16,188 कामे शेल्फवर.    

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result