महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अंबाजोगाई-केज तालुक्यातील विविध विकासकामाचा पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ सोमवार, ०४ फेब्रुवारी, २०१९

बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते केज, अंबाजोगाई तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह विविध कामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास आमदार संगिता ठोंबरे, रमेश आडसकर, समाज कल्याण सभापती संतोष हंगे आदींची उपस्थिती होती

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. समाजातील वंचित घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासाची कामे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पक्का रस्ता मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामधील काही रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत तर काही रस्त्यांची कामे लवकरच सुरु होणार आहेत. केज तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या २४ कामासाठी ५५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवानबाबा चौकापर्यंत शहरांमधून जाणाऱ्या ५ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व नाली बांधकाम करण्यासाठी २ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच अंबाजोगाई येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले असून या इमारतीसाठी २ कोटी २१ लाख रुपये खर्च झाला आहे. त्याचबरोबर नगर परिषद अंबाजोगाई राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पणही पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीसाठी जवळपास ५० लक्ष रुपये खर्च झाला आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांबरोबरच नवीन झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांसाठी आधुनिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या ठिकाणी जनावरांचे एक्सरे, रक्त तपासणी, सोनोग्राफी यासारख्या सुविधा या दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आल्‍या असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.


जिल्हास्तरीय चाचा नेहरु बालमहोत्सवाचे पालकमंत्री पकंजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन
केज येथे महिला बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, या ठिकाणी आलेल्या सर्व बालकांनी चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आजचा बालक उद्याचे भविष्य असून एक चांगला नागरिक होण्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाबरोबरोच चांगले आरोग्यही दिले पाहिजे. यावेळी सी.एम. चषक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांनाही पालकमंत्री महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हारुन इनामदार यांनी केले.

अंबाजोगाई येथे मा. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते साठे चौकात यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवानबाबा चौकापर्यंत जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ, नागरी आरोग्य केंद्र इमारतीचे उद्‌घाटन आणि तालुका लघु पशुचिकित्सालय इमारतीचं उद्‌घाटन करण्यात आले. तर बनसारोळा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व विविधविकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम कुलकर्णी आणि डॉ.आघाव यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result