महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासकीय इतमामात अजित काशीद यांना अखेरचा निरोप बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७
सांगली : शहीद जवान अजित काशीद अमर रहे... जब तक चाँद सुरज रहेगा अजित तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, देश का बेटा कैसा हो.. शहीद अजित काशीद जैसा हो.. अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी शहीद जवान अजित काशीद यांना त्यांच्या मूळ गावी निगडी खुर्द येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी आमदार विलासराव जगताप, जिल्हाधिकारी वि.ना.काळम, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनील गोडबोले, हवालदार संदीप काळे, नातेवाईक व हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

शहीद अजित काशीद यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी निगडी खुर्द येथे आणण्यात आले. त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ, बहीण व नातेवाईकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. उपस्थित जनसमुदायासाठीही पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरूवात झाली. अंत्ययात्रेच्या मार्गावर गावातील चौका-चौकात शहीद काशीद यांच्या सन्मानार्थ बॅनर्स लावण्यात आले होते.

काशिद कुटुंबियांच्या शेतजमिनीवर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी प्रादेशिक सेनेच्या 109 इन्फंट्री मराठा एल. आय. बटालियन व जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद अजित काशीद यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद काशीद यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच, शहीद काशीद यांच्या कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले व आधार दिला. शहीद अजित काशीद हे 23 वर्षांचे होते. ते अविवाहित होते. त्यांच्यापश्चात आई चिंगुबाई, वडील नारायण, भाऊ सुनील व विवाहित बहीण निर्मला कदम असा परिवार आहे.

बंधू सुनील काशीद यांनी अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले व भडाग्नी दिला. यावेळी शहीद अजित काशीद..अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result