महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्त शिवार अभियानातून राज्याची टंचाईमुक्तीकडे वाटचाल - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
सांगली : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी टंचाईमुक्त महाराष्ट्र सर्वांसाठी पाणी 2019 जलयुक्त शिवार योजनेमधून गेल्या तीन वर्षांत राज्यात जलसंधारणाची भरीव कामे झाली. त्यातून भूजलपातळी वाढली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन, उत्पन्नात वाढ झाली आहे. अर्थार्जन वाढल्यामुळे जीवनस्तर वाढला आहे. जी.डी.पी. मध्ये वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून राज्याची टंचाईमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज येथे केले.

सांगली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, तरूण भारत समूह प्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकूर, गोपीचंद पडळकर व्यासपीठावर उपस्थित होते.

मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे म्हणाले, दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पाणी अडवा, पाणी जिरवा हे धोरण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. विविध सात खात्यांच्या जवळपास 14 योजना एकत्रित करून पाण्याचा थेंब अन् थेंब अडवला गेला पाहिजे, या दृष्टीने नियोजन केले. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत 4 लाख 25 हजार कामे पूर्ण झाली असून, त्यातून 11 हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. यासाठी शासनाने जवळपास सात हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली. विविध देवस्थान, सी.एस.आर आणि लोकसहभागातूनही या अभियानाला मोठा निधी प्राप्त झाला आहे. अभियानामुळे टँकरची संख्या 7 हजारवरून दीड हजारवर आली आहे. 2019 पर्यंत उर्वरित महाराष्ट्रही दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून संपूर्ण राज्यात भूजलपातळी जवळपास दीड ते दोन मीटरने वाढली आहे. नवीन कामांबरोबरच जुन्या कामांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केला आहे. यासह राज्य शासनाने राबवलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाचाही फायदा झाला आहे. पर्जन्यमानाचे विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण झाले. ही जलसंधारणाची कामे आपणाला पुढे घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result