महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणीसाठी मार्गदर्शन करावे - पालकमंत्री विष्णू सवरा गुरुवार, ३० मे, २०१९


पालघर :
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा होण्याचा अंदाज असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पेरणीचे नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिले.

खरीप २०१९ हंगामपूर्व जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन श्री. सवरा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. सवरा यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, आमदार पास्कल धनारे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जव्हारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ.अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. सवरा म्हणाले, कृषी विभागाने पुढील वर्षाचे चांगले नियोजन केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेताना नवनवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. मागील वर्षी योजना राबविताना आलेल्या अनुभवानुसार ज्या योजनांचा शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल अशा योजनांसाठी अधिक प्रयत्न करावेत. शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज सोडण्याची योजना उपयुक्त आहे, या योजनेचा शेतकऱ्यांना अधिक लाभ घेता यावा यासाठी शेततळ्यांची संख्या वाढविण्यावरही भर द्यावा. मोगरा लागवड योजनेचाही आढावा घेऊन त्यातील नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंगचे नियोजन या बाबीही विचारात घ्याव्यात. यांसह विविध योजनांमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. खरीप हंगामात लागणाऱ्या बियाणे, खते, किटकनाशके आदींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याबाबत आढावा घेऊन शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

आमदार श्री. धनारे यांनी ज्या शेतीपंपांना अद्याप वीजपुरवठा झालेला नाही त्यांना तातडीने वीजपुरवठा करावा, तसेच पीक विम्याची उर्वरित रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी सूचना केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी.तरकसे यांनी यावेळी मागील वर्षीचा आढावा घेऊन खरीप २०१९ चे नियोजन सादर केले. मागील वर्षी झालेल्या अनियमित पावसामुळे उत्पादकता कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विभागामार्फत जिल्ह्यात २५ मे ते ८ जून या कालावधीत ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ पंधरवडा राबविण्यात येत असून या कालावधीत ८२८ गावांमधून ८३ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात पेरणीपूर्व कामांपासून उत्पादनाच्या मार्केटिंगपर्यंतच्या सर्व टप्प्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचे व्यवस्थापन’ या घडीपुस्तिकेचे तर भात बीजप्रक्रिया आणि शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदी करताना घ्यावयाची काळजी या भित्तीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले.आत्माचे प्रकल्प संचालक पी.एम.चांदवडे यांनी आभार प्रदर्शन केले.

ठळक बाबी :

 • पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४,६९,६९९ हेक्टर एवढे असून एकूण १००८ गावांमध्ये ४७७ ग्रामपंचायती आहेत.
 • जिल्ह्यात खातेदारांची संख्या १,४५,५३६ एवढी असून त्यामध्ये सर्वसाधारण ७५,५२१ अनुसूचित जाती ३४१५ व अनुसूचित जमाती ६६,६०० इतकी आहे.
 • जून ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत पालघर जिल्ह्यात प्रत्यक्ष पडलेला सरासरी पाऊस २४४५.६० मि.मी. इतका असून याची टक्केवारी साधारणत: ९६.३९ एवढी आहे. (तथापि जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्यात अतिवृष्टी तसेच ऑगस्टमध्ये आणि त्यानंतर पाऊस कमी झाल्याने शेतीसाठी उपयुक्त ठरला नाही.)
 • सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात खरीप पिकासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत १४,३३३ सभासदांना रु.१४५.२२ कोटी इतक्या लक्षांकापैकी रु.८६.४७ कोटी एवढे वाटप करण्यात आले.
 • प्रधानमंत्री पीक विमा योजना भात, नागली व उडीद या पिकांकर‍िता सन २०१८-१९ मध्ये एकूण १९,११२ सहभागी शेतकरी असून १२,५३९.२४ हे. एवढ्या क्षेत्रात विमा संरक्षण देण्यात आले होते.
 • हवामानावर आधारित पीक विमा योजना चिकू खरीप हंगाम सन २०१८-१९ या वर्षात सहभागी शेतकरी संख्या ३००३ असून ३३५८.९६ हे. एवढ्या क्षेत्रात विमा संरक्षण देण्यात आले होते.
 • सन २०१८-१९ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशके यासाठी गुणनियंत्रण कामाचा ८५४ एवढा लक्षांक असून ९२३ साध्य आहेत.
 • सन २०१८-१९ मध्ये युरिया, एम.ओ.पी., डी.ए.पी., एस.एस.पी. व इतर खते मिळून १८,१७६ मे.टन एवढा रासायनिक खताचा पुरवठा करण्यात आला आहे.
 • सन २०१९ मध्ये पालघर जिल्ह्यात भात बियाणे खरीप हंगामाकर‍िता महाबीज संकरीत व खाजगी सुधार‍ित असे एकूण २२,९१६ क्विंटल मागणी करण्यात आली आहे.
 • युरिया, एम.ओ.पी., डी.ए.पी., एस.एस.पी., इतर खते असे एकूण २४,७६० मे.टन खताची मागणी करण्यात आली आहे.
 • सन २०१९-२० मध्ये विविध कीटकनाशके पुरविण्याचे नियोजन आहे.
 • सन २०१९-२० साठी पीक कर्ज वाटपाकरिता खरीप हंगामासाठी रु.१५३.१९ कोटी एवढा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result