महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हा नियोजनचा निधी १७५ कोटी करण्याची अर्थमंत्र्यांना मागणी शनिवार, १९ जानेवारी, २०१९


भंडारा : जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत भंडारा जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा निधी 175 कोटी करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ठेवला असता त्यांनी त्या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शविली. वाढीव निधी आरोग्य, शिक्षण व जलसंधारणावर खर्च करण्याच्या सूचना अर्थमंत्र्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आज अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार मधुकर कुकडे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी शांतनु गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सन 2019-20 च्या आर्थिक वर्षासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी 303 कोटी 40 लाख रुपयांचे प्रस्ताव सादर केले होते. शासनाने 91 कोटी 41 लाख रुपयांची मर्यादा आखून दिली होती. जिल्ह्यातील यंत्रणांनी 211 कोटी 94 लाखांची अतिरिक्त मागणी नोंदविली आहे. अतिरिक्त मागणीमध्ये प्रामुख्याने कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास कार्यक्रम, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा विकास, परिवहन रस्ते व पूल, सामान्य सेवा व आर्थिक सेवांचा समावेश आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 मध्ये अर्थसंकल्पीय तरतूद 139 कोटींची होती. सन 2019-20 साठी भंडारा जिल्ह्यास किमान 175 कोटींचा निधी मिळावा अशी भूमिका पालकमंत्री चंद्रशेख्रर बावनकुळे यांनी मांडली. यात प्रामुख्याने जन सुविधांसाठी विशेष अनुदान, नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, क्रीडा विकास, रेशीम विकास, नगर विकास, ऊर्जा विकास, पर्यटन विकास, शिक्षण व जलसंधारण याचा समावेश आहे.

वाढीव मागणीवर अर्थमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, आरोग्य, अंगणवाडी विकास व जलसंधारण या कामांना प्राधान्य देण्यात यावे. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सादरीकरण करुन अतिरिक्त निधीच्या आवश्यकतेबाबत माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result