महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तलाठ्याच्या स्वाक्षरीचा सातबारा आता घरबसल्या मंगळवार, ०१ मे, २०१८
जिल्ह्यातील तीन तालुके पूर्णत: ऑनलाईन

पालकमंत्र्यांकडून महसूल कर्मचाऱ्यांचाही गौरव

ठाणे :
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सातबारा संगणकीकारणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित चार तालुक्यातील कामही महिन्याभरात पूर्ण होईल. या कामामुळे आता नागरिक किंवा शेतकरी कुणालाही तलाठ्याच्या स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची घरबसल्या प्रिंट मिळू शकेल. विशेष म्हणजे हा सातबारा सर्व प्रकारच्या शासकीय व निम शासकीय कामांसाठी ग्राह्य धरला जाणार असून तलाठ्याच्या वेगळ्या स्वाक्षरीची गरज नाही.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथील नियोजन भवनातील सभागृहात या डिजिटल सातबाराचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले, यावेळी हे काम दिवसरात्र मेहनतीने पूर्ण करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचाही सत्कार प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला

https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून पूर्वी ऑनलाईन सातबारा केवळ पहाता यायचा. आता तलाठ्याची स्वाक्षरी असलेला सातबारा प्रिंट काढता येणार आहे. या सुविधेमुळे तहसील कार्यालयांत या कामासाठी खेटे मारण्याची आवश्यकता उरली नाही त्याचप्रमाणे काम गतिमान आणि अधिक पारदर्शी होईल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

तलाठ्यांच्या पाठीशी
उत्पन्नाच्या दाखल्यांवरून तलाठ्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे, काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मी स्वत: मंत्रिमंडळ बैठकीत ही गोष्ट मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या कानावर घातली असून तलाठ्यांना त्रास होणार नाही याची खात्री बाळगा, असेही पालकमंत्री म्हणाले.

याप्रसंगी बोलतांना अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सांगितले की, येत्या महिन्याभरात उर्वरित चार तालुक्याचे राहिलेले थोडेसे कामही पूर्ण होईल आणि संपूर्ण जिल्हा सातबारा डिजिटल होईल. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी संगीता पवार आणि नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result