महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली स्वच्छतेची शपथ शनिवार, २० जानेवारी, २०१८
वर्धा : भारत सरकारतर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेत वर्धा नगर परिषद सहभागी झाली असून स्वच्छतेबाबत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. वर्धा शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थी आणि शाळांचा सहभाग असलेल्या स्वच्छता रॅलीत शहरातील सुमारे 30 शाळातील 3 हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पूर्ण शहरभर स्वच्छतेचा जागर केला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांना शपथ देऊन कायम स्वच्छता राखण्याविषयी प्रोत्साहित केले.

पोलीस मैदानावर समारोप झालेल्या या रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमोळे उपस्थित होत्या.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 स्पर्धेत वर्धा नगर परिषद सहभागी झाल्यामुळे या स्पर्धेविषयी आणि स्वच्छतेविषयी नागरिकांना जागृत करणे हा आजच्या रॅलीमागचा मुख्य उद्देश होता. 9 वाजता लोकमहाविद्यालाय येथून खासदार रामदास तडस यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केली. स्वच्छता रॅली शास्त्री चौक, बजाज चौक, काळे चौक, वल्लभभाई पटेल पुतळा, आंबेडकर चौक मार्गे पोलीस मैदानावर दाखल झाली. या रॅलीत स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या 14 झांकी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थी, शिक्षक नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी सोबतच झांकीमुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण शहरभर स्वच्छतेचा जागर करून शहर, घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश रॅलीतून देण्यात आला.यावेळी आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्याना स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result