महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण मंगळवार, ०१ मे, २०१८
सांगली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिनी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक शशीकांत बोराटे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त श्री.देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीतवादनाने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यानंतर विविध पथकांनी दिमाखदार संचलन करुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. या संचलनाचे नेतृत्व मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांनी केले. यावेळी झालेल्या संचलनामध्ये जिल्हा पोलीस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस पथक, वाहतूक नियंत्रण कक्षाचे पथक, अग्निशमन दलाचे पथक आदि सहभागी झाले. तसेच पोलीस दलाकडील पोलीस बँड पथक, वज्र वाहन, दंगल नियंत्रण पथक, बाँब शोधक व बाँब नाशक पथक, निर्भया पथक, गस्त पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका आणि अग्निशमन पथक इत्यादि पथकांचा सहभाग होता.

या सोहळ्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण भुकटे आणि बापूसाहेब पाटील, पद्मश्री विजयकुमार शहा, अशोकराव पवार यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, महिला, विद्यार्थी, नागरिक व निमंत्रणांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे व पोलीस विभागाचे बाळासाहेब माळी यांनी केले.

प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या ध्वजारोहण समारंभासाठी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result