महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक काळात गांभीर्याने काम करावे- जिल्हाधिकारी सोमवार, ११ मार्च, २०१९


आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी
बुलडाणा :
लोकसभा निवडणूक 2019 ची आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासनाच्या वतीने शासकीय कार्यालय इमारतीवरील राजकीय पक्षांची झेंडे, संदेश तसेच काही प्रचार साहित्य असल्यास ताबडतोब काढून टाकावे. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. निवडणूक काळात शासनाचा प्रत्येक विभाग हा कुठल्या ना कुठल्या निवडणूक कामामध्ये व्यस्त असणार आहे. निवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या प्रत्येकाने गांभीर्याने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात लोकसभा निवडणूक 2019 तयारीबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रावरील घडामोंडीवर बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाल्या, ज्या केद्रांवर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताआहे. अशा ठिकाणी पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कुठेही संवाद हीनता असू नये. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे नवीन कामांचे कार्यारंभ आदेश देवू नये, निविदा काढू नयेत. आचारसंहिता भंग केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रावरील व्यवस्था, मतदार जनजागृती आदींचा आढावा घेण्यात आला.

प्रशासनास सहकार्य करून निवडणूक यशस्वीरित्या पार पाडावी

बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी 19 मार्च 2019 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्जासाठी अंतिम 26 मार्च 2019 असणार आहे. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करून निवडणूक यशस्वीरित्या पार पाडावी, अशी अपेक्षा डॉ. डांगे यांनी आज व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, शिवसेना पक्षाच्यावतीने जालिंधर बुधवत, राजू मुळे, काँग्रेस पक्षाकडून सुनील सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संतोष पवार, भाजप पक्षाकडून ॲड मोहन पवार आदी उपस्थित होते.

नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराच्या ताफ्यात आयोगाच्या सुचनेनुसार तीन वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात आत आणण्याची परवानगी असेल. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी उमेदवारासोबत पाच व्यक्ती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात जावू शकतील. उमेदवारांना 70 लक्ष रूपये खर्चाची मर्यादा आहे. यापेक्षा जास्त खर्च होवून आचार संहीतेचे उल्लंघन होणार नाही. याबाबत काळजी घेण्यात यावी. आचार संहीता अंमलबजावणीकरीता राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result