महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे मुद्रकांनी पालन करावे- भागवत डोईफोडे शुक्रवार, १५ मार्च, २०१९


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुद्रण चालकांच्या बैठकीत निर्देश

धुळे :
भारत निवडणूक आयोगाने मुद्रण, छपाईसंदर्भात विविध निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करणे सर्व मुद्रण चालकांची जबाबदारी आहे, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी येथे दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी धुळे जिल्ह्यातील मुद्रण चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार किशोर कदम, संजय शिंदे आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी श्री. डोईफोडे यांनी सांगितले, निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपला दैनंदिन खर्च सादर करावा लागतो. या खर्चात मुद्रण साहित्याचाही समावेश आहे. उमेदवाराशी निगडित पोस्टर, बॅनर, भित्तीपत्रक तयार करताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी मुद्रकांनी घ्यावी. उमेदवाराचे लेखी संमती पत्राशिवाय मजकुराची छपाई करू नये. मजकुरात काही संशयास्पद वाटल्यास जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे संपर्क साधावा.

सर्व प्रकारच्या मुद्रणासाठी भारत निवडणूक आयोगाचे निर्बंध लागू असतील. त्यामुळे सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे. निवडणूक कालावधीत पत्रके, भित्तीपत्रकांची छपाई करण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127- क प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पॉम्फलेट, पोस्टरची छपाई करताना मुद्रकांनी दक्षता बाळगावी. कोणत्याही व्यक्तीकडून निवडणुकीशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या मुद्रण साहित्यावर मुद्रक, प्रकाशक (Printer & Publisher) चे नाव व संपूर्ण पत्ता दर्शनी भागात नमूद करणे आवश्यक आहे. मुद्रक व प्रकाशकाने अशी प्रसिध्दी करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडून त्यास ओळखत असलेल्या दोन व्यक्तींच्या समक्ष व त्यांच्या साक्षांकनासह त्यांच्याकडून दोन प्रतीत घोषणापत्र घेतल्याशिवाय मुद्रीत करू नयेत. तसेच अशाप्रकारची प्रसिध्दी, छपाई केल्यावर घोषणापत्राची एक प्रत, पोस्टर, पॉम्फलेटच्या चार प्रती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालय, धुळे येथे सादर कराव्यात. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईले, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके आदींची छपाई करण्यासंबंधीची माहिती विहित नमुन्यात सादर करावी. त्यात मुद्रक व प्रकाशकाचे नाव व पत्ता, प्रकाशकाच्या छपाई आदेशाचा दिनांक, प्रकाशकाचे शंभर रुपयांच्या मुद्राकांवरील प्रतिज्ञापत्र, पत्रक/ भित्तीपत्रकाचा तपशील, छापावयाच्या प्रतींची संख्या आदींची माहिती सादर करावी, असे उपविभागीय अधिकारी श्री. दराडे यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भामरे यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127- क याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result