महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वर्धामध्ये बचत गटांचा ‘द रूरल मॉल’ सुरू गुरुवार, ०५ ऑक्टोंबर, २०१७
वर्धा : बचत गटाच्या माध्यमातून उभे राहिलेले गृह आणि कुटीर उद्योगांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘द रुरल मॉल’ सुरु करण्यात आला आहे. या मॉलचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते प्रत्यक्ष उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, कृषि समृध्दी समन्वयीत विकास प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक निलेश वावरे, माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी ललिता दारोकर उपस्थित होत्या.

द रुरल मॉल हे बचत गटाच्या व्यवसायाला मिळालेली सूवर्ण संधी असून महिलांनी व शेतकऱ्यांनी याचा चांगला उपयोग करुन घ्यावा. तसेच उत्पादित मालाची गुणवत्ता टिकून ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत यांनी उत्पादित आणि प्रक्रिया केलेल्या कृषि उत्पादनांना विक्रीचे ठिकाण उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने ‘द रुरल मॉल’ सुरु केला आहे. मुख्य रेल्वे स्टेशन समोरील पुरवठा विभागाच्या बंद असलेल्या गोदामाला मॉलचे रुप देण्यात आले आहे. ग्राहकांच्या सेवेत दाखल करण्यात आलेल्या या मॉलच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या प्रतिची उत्पादने वाजवी दरात उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना थेट बाजाराच्या प्रवाहात आणून विपनन प्रक्रियेशी जोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेला हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. ग्राहकांनी या मॉलला भेट देऊन शेतकरी बचत गटाच्या उत्पादनाची खरेदी करावी आणि त्याबद्दलचे अभिप्राय कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

दरम्यान, महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मॅालचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी महिला आणि शेतकरी बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे प्रतिपादन केले होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result