महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची माहिती तातडीने संकलित करा- पीयूष सिंह शुक्रवार, १२ जुलै, २०१९


विभागीय आयुक्तांनी घेतला विविध योजनांचा आढावा

वृक्ष लागवड मोहिमेस गती देण्याच्या सूचना

वाशिम :
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अद्याप माहिती संकलित करण्यात न आलेले पात्र लाभार्थी तसेच संयुक्त खातेदारांमधील पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलनाची कार्यवाही लवकरात लवरक पूर्ण करावी. तसेच ही माहिती अचूक असेल याची काळजी घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उप वनसंरक्षक सुमंत सोलंकी यांच्यासह प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा उप निबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, धनंजय गोगटे, अनुप खांडे, संदीप भास्के, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रशांत बोरसे, न.प. प्रशासन अधिकारी दीपक मोरे, सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची आवश्यक माहिती लवकरात लवकर संकलित करून ती ऑनलाईन अपलोड होणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याची माहिती घेताना ती अचूक असेल याची काळजी घ्यावी. चुकीची माहिती अपलोड केल्यानंतर ती ऑनलाईन प्रणालीमध्ये अमान्य होवून परत येते. पुन्हा ती माहिती दुरुस्त करण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे ही माहिती संकलित करतानाच आवश्यक काळजी घेतल्यास वेळेची बचत होईल. तसेच दुरुस्तीसाठी परत आलेल्या माहितीच्या अनुषंगाने तातडीने आवश्यक कार्यवाही करून ही माहिती पुन्हा अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

वृक्ष लागवड मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेले ४३ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचे योगदान आवश्यक आहे. वृक्ष लागवडीच्या कामाला सर्व विभागांनी गती द्यावी, तसेच वृक्ष लागवड झाल्यानंतर त्याविषयीची माहिती वन विभागाने विकसित केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर सादर करावी. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनाही वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी करून घ्यावे. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान अंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या नझुल जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावाही श्री. सिंह यांनी यावेळी घेतला. तसेच याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची संकलित करण्याचे काम गतीने सुरु असून याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दोन दिवस मोहीम राबविण्यात येत आहे. संकलित झालेली माहिती तातडीने अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. सोलंकी म्हणाले, जिल्ह्याला सुमारे ४३ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून जिल्हास्तरीय समितीने सुमारे ४५ लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. वृक्ष लागवडीचे काम सुरु झाले असून लवकरात लवकर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप पिक कर्ज वितरण, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नागरी भागातील घनकचरा व्यवस्थापन, महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान आदी बाबींचाही विभागीय आयुक्तांनी यावेळी आढावा घेतला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result