महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
क्रीडा, कला व सांस्कृतिक स्पर्धेमुळे नवचैतन्य निर्माण होते – विभागीय आयुक्त अनुप कुमार शुक्रवार, ०३ मार्च, २०१७
महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

वर्धा :
क्रीडा, कला, सांस्कृतिक स्पर्धामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन कामाचा ताण कमी होतो. तसेच कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी आज विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा 5 मार्च पर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नागपूर विभागाचे उपआयुक्त जींतेद्र पापळकर, जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्हाधिकारी एन.के.लोणकर उपस्थित होते.

क्रीडा संस्कृती ऐतिहासिक काळापासून सुरु असून पुर्वीच्या काळात तिरंदाजी सारखे खेळ प्रचलित होते. ऐतिहासिक काळापासून महसूल अधिकाऱ्यांना महत्त्व आहे. महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचे अंग आहे. या विभागावर शासनाने टाकलेली कामाची जबाबदारी जास्त असल्यामुळे अशा क्रीडा स्पर्धामुळे त्यांच्यावर असलेला कामाचा ताण कमी होतो. स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडू अधिकारी व कर्मचारी यांनी खेळाडू वृत्तीने खेळावे. स्पर्धेमध्ये विजय महत्त्वाचा नसून स्पर्धेमध्ये भाग घेणे याला जास्त महत्त्व आहे. यासाठी खेळीमेळीच्या वातावरणात खेळून स्पर्धेत विजय संपादन करावा. व विभागाने राज्यस्तरीय स्पर्धेत नाव लौकिक करावे अशा शुभेच्छा आयुक्त अनुपकुमार यांनी खेळाडू, अधिकारी व कर्मचारी यांना दिल्यात.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे जिल्ह्यात स्वागत करुन विभागीय क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील असा विश्वास व्यक्त केला. खेळाडूंनी ऐक्य आणि बंधुत्वाच्या भावनेतून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे तसेच जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

खेळाडूने या स्पर्धेत केवळ विजयाचे समाधान न मानता राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त् करावी. यामुळे शासनाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंना आगाऊ वेतन वाढ देण्यात येते. यासंधीचा लाभ घ्यावा, असे नयना गुंडे म्हणाल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन अजय राजपायले यांनी तर आभार मंगेश जोशी यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result